२७ मनसैनिकांना ‘भोंगा’ भोवला! जुन्या नाशकात हनुमान चालीसा वाजविण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 01:30 PM2022-05-05T13:30:07+5:302022-05-05T13:37:04+5:30
मशिदींवरील भोंग्यांद्वारे दिल्या जाणाऱ्या अजानवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी बुधवारपर्यंत (दि. ४) ...
मशिदींवरील भोंग्यांद्वारे दिल्या जाणाऱ्या अजानवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी बुधवारपर्यंत (दि. ४) भोंगे उतरविले गेले नाहीत तर त्या मशिदींजवळ दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजविण्याचा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिला होता. यानंतर नाशिकमध्ये मुस्लिमबहुल भागात बुधवारी पहाटेपासूनच मनसेचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते हनुमान चालीसा वाजविण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यान, भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मशिदीजवळ पहाटेच्या सुमारास घोषणाबाजी करणाऱ्या सहा महिला पदाधिकाऱ्यांसह इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंदोलनाच्या तयारीत असलेल्या १४ कार्यकर्ते आणि सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात पदाधिकारी अशा एकूण २७ मनसे सैनिकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांकडून दुपारी न्यायालयापुढे उभे करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना १५ दिवसांकरिता शहरासह जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच पहाटेपासून आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीस प्रशासन सतर्क असल्यामुळे कोठेही कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला नाही. जुने नाशिकसह सर्वच परिसरात शांततापूर्ण वातावरण रात्री उशिरापर्यंत कायम होते.
जुन्या नाशकात हनुमान चालीसा वाजविण्याचा प्रयत्न
भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवार पेठेत छपरीच्या तालीमसमोर जबरेश्वर हनुमान मंदिरालगत विजेच्या खांबावर भोंगा लावून हनुमान चालीसा वाजविण्याचा प्रयत्न चार अज्ञात व्यक्तींनी केला असता पोलिसांनी धाव घेत एम्लिफायर, भोंगा आदी साहित्य जप्त केले आहे. त्यांच्याविरुद्ध मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा संशयितांची ओळख पटली असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी सांगितले.
न्यायालयाने घेतले बंधपत्र
आंदोलन करणाऱ्या ज्या मनसे सैनिकांना न्यायालयाने हद्दपार करण्याचे आदेश दिले, त्यांना अशा प्रकारच्या कुठल्याही आंदोलनात कोठेही सहभागी होऊ नये, तसेच ज्या जिल्ह्यात पंधरा दिवसांकरिता राहण्यास जाणार आहे, त्याची माहिती बंधपत्रात भरून घेण्यात आली आहे. न्यायालयाकडे २७ मनसे सैनिकांनी बंधपत्र लिहून दिले आहे