पूर्व प्रभागवर मनसे-अपक्षांचा दावा
By admin | Published: March 14, 2016 11:52 PM2016-03-14T23:52:22+5:302016-03-15T00:10:41+5:30
सभापतिपदासाठी चुरस : सर्वाधिक सदस्य असूनही मनसे उपेक्षित
इंदिरानगर : महापालिकेच्या सहाही प्रभाग समिती सभापती पदासाठी एप्रिलमध्ये निवडणुका होणार असून, नाशिक पूर्व प्रभाग सभापतिपदाकरिता यंदा पुन्हा अपक्षांनी दावा सांगितला आहे, तर सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या मात्र गेल्या चार वर्षांत उपेक्षित राहिलेल्या मनसेकडूनही दावा केला जात आहे. त्यामुळे सभापतिपदासाठी सत्ताधारी महाआघाडीतच चुरस बघायला मिळण्याची शक्यता आहे.
नाशिक पूर्व प्रभाग समितीमध्ये मनसे-९, राष्ट्रवादी-५, शिवसेना-१, भाजपा-२, अपक्ष-३, कॉँग्रेस-४ असे पक्षीय बलाबल आहे. त्यात मनसेचे डॉ. दीपाली कुलकर्णी, यशवंत निकुळे, अर्चना जाधव, गुलजार कोकणी, वंदना शेवाळे, सुमन ओहोळ, मेघा साळवे, अर्चना थोरात, राष्ट्रवादीचे विनायक खैरे, संजय साबळे, सुफी जीन, रंजना पवार व नीलिमा आमले, कॉँग्रेसचे शाहू खैरे, वत्सला खैरे, समीना मेमन व राहुल दिवे, शिवसेनेचे सचिन मराठे, भाजपाचे सतीश कुलकर्णी व प्रा. कुणाल वाघ, अपक्ष गटाचे संजय चव्हाण, रशिदा शेख व शबाना पठाण यांचा समावेश आहे. मनसेचे सतीश सोनवणे हे भाजपात दाखल झाले असल्याने मनसेचे संख्याबळ ८ झाले आहे. महापालिकेत मनसे, राष्ट्रवादी, कॉँग्रेस आणि अपक्ष यांची महाआघाडी आहे. गेल्या चार वर्षांत पूर्व प्रभागवर कॉँग्रेसच्या समीना मेमन यांनी दोनदा तर भाजपाचे प्रा. कुणाल वाघ व अपक्ष शबाना पठाण यांनी एकदा सभापतिपद भूषविलेले आहे. अखेरच्या वर्षी सभापतिपदावर अपक्षांनी पुन्हा एकदा दावा सांगितला असून, शबान पठाण यांची पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र, सत्ताधारी मनसेला गेल्या चार वर्षांत जास्त संख्याबळ असूनही सभापतिपद न मिळाल्याने मनसेकडूनही दावेदारी केली जात आहे. त्यात प्रामुख्याने, वंदना शेवाळे, अर्चना जाधव व अर्चना थोरात यांच्या नावांची चर्चा आहे. (वार्ताहर)