नाशिक : महापालिका निवडणुकीत प्रभाग १४ मधून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या मुशीर सय्यद मनसेच्या गटात सामील झाल्याने महापालिकेची अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर तौलनिक संख्याबळानुसार भाजपा, सेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्याबरोबरच आता मनसेचाही सदस्य नियुक्त होणार आहे. याशिवाय, अन्य समित्यांवरही मनसेला प्रतिनिधित्व मिळणार आहे. महापालिका निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक ६६, शिवसेनेचे ३५, कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी ६, मनसेचे ५, अपक्ष ३ आणि रिपाइंचा १ नगरसेवक निवडून आला आहे. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपाचा महापौर-उपमहापौर बसण्याबरोबरच स्थायी समितीच्या सभापतिपदीही भाजपाचाच नगरसेवक विराजमान होणार आहे. तौलनिक संख्याबळानुसार, भाजपाचे ९, शिवसेनेचे ४, कॉँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी १ सदस्य स्थायीवर जाऊ शकतो. परंतु, मनसेचे ५ सदस्य असल्याने आणि त्यांचा कोटा पूर्ण होत नसल्याने मनसेला स्थायीत स्थान मिळणार नव्हते. मात्र, शिवसेनेने आपले ५ सदस्य जाण्यासाठी तीन अपक्षांपैकी दोघांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार, सेनेने अपक्षांची सोबत गटनोंदणी होण्यासाठी प्रयत्नही चालविले आहेत परंतु सेनेने आपल्या ३५ सदस्यांची एकत्रित गटनोंदणी आधीच करून घेतल्याने पुन्हा अपक्षांना सोबत घेऊन नोंदणी करता येणार नाही, अशी भूमिका विभागीय आयुक्तांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे सेनेला फटका बसला आहे. मात्र, मनसेने गटनोंदणीची घाई न करता स्थायीत प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी धडपड चालविली. त्याला यश येत प्रभाग १४ मधून अपक्ष म्हणून निवडून आलेले मुशीर सय्यद यांनी मनसेला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शुक्रवारी मनसेच्या ५ सदस्यांसह अपक्ष मुशीर सय्यद यांचीही एकत्रित गटनोंदणी करून घेण्यात आली. त्यामुळे मनसेचे संख्याबळ ६ झाले असून, तौलनिक संख्याबळानुसार मनसेचा एक सदस्य स्थायीवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, शहर विकासासाठी आपण मनसेला सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया मुशीर सय्यद यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
अपक्षाच्या साथीने मनसेचा स्थायीत होणार प्रवेश
By admin | Published: March 11, 2017 1:36 AM