मोबाइल बिघडला, म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:17 AM2021-06-09T04:17:09+5:302021-06-09T04:17:09+5:30
नाशिक : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने बाजारपेठ अनलॉक होताच, अत्यावश्यक सेवेच्या दुकानांसोबतच मोबाइल विक्रीची व दुरुस्तीच्या दुकानांमध्येही ...
नाशिक : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने बाजारपेठ अनलॉक होताच, अत्यावश्यक सेवेच्या दुकानांसोबतच मोबाइल विक्रीची व दुरुस्तीच्या दुकानांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. कोरोनाच्या काळात वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइलचे महत्त्व वाढले आहे. मात्र, या काळात दुकाने बंद असल्याने अनेकांना नवीन मोबाइल खरेदी करता आला नाही, तर अनेकांचे मोबाइल नादुरुस्त झाल्यानंतर त्यांना दुरुस्त करता आले नव्हते, अशा सर्व नागरिकांनी बाजारपेठ सुरू होताच, दुकानांमध्ये मोबाइल खरेदी आणि दुरुस्तीसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. आहे. मात्र, अशा प्रकारे गर्दी केल्याने पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने, अशा प्रकारे दुकानांमध्ये गर्दी करून आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला दुकानदारांकडून दिला जात आहे. मात्र, कोरोना संकट काळा टाळेबंदीदरम्यान नागरिकांना मोबाइलची चांगलीच निकड जाणवल्याने वारंवार सांगूनही ग्राहकांकडून मोबाइल खरेदी व दुरुस्तीसाठी दुकानांमध्ये गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
----
गर्दीचे कारण काय
- मोबाइलची बॅटरी बदलण्यासाठी
- चार्जिंग सॉकेट खराब झाले
- चार्जर खराब झाला
- स्क्रीनगार्ड बदलण्यासाठी
- नवा मोबाइल घेण्यासाठी
- मोबाइल हँग होत असल्यामुळे
- मोबाइल कव्हर घेण्यासाठी
-------
दोन महिन्यांपासून दुकाने बंद
- कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जवळपास दोन महिन्यांपासून शहरातील दुकाने बंद होती. आता निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे मोबाइल दुरुस्तीसाठी, तसेच नवीन मोबाइल घेण्यासाठी ग्राहक दुकानात येत आहेत.
- दुकानदारांकडून सुरक्षित अंतर राखण्यासोबतच नियमांचे पालन करण्याच्या सूचना ग्राहकांना सातत्याने दिल्या जात आहेत. मात्र, अनेकदा ग्राहकांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असून, गर्दी झाल्यामुळे दुकाने बंद करण्याची वेळ येत असल्याने त्याचा फटका व्यवसायालाही बसत असल्याची खंत मोबाइल दुकानदारांकडून व्यक्त होत आहे.
-----
मोबाइल महत्त्वाचाच, पण आरोग्य?
कोरोनाच्या संकटामुळे सध्या घरूनच काम करण्यासाठी आणि मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल महत्त्वाचा घटक बनला आहे. त्यामुळे मोबाइल दुरुस्तीसाठी नागरिकांची गर्दी होत असली, तरी सर्वांनी आरोग्याची काळजी घेत, प्रतिबंधात्मक खबरदारी घेतली पाहिजे.
- अजिंक्य जाधव, ग्राहक
सध्या मोबाइल महत्त्वाचा घट बनला आहे, परंतु सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, गर्दी केल्यामुळे आपल्यासोबत आपण दुसऱ्यालाही संकटात तर टाकत नाही ना, याची खबरदारी घेत प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे आवश्यक आहे.
- विलास पवार, ग्राहक
---
दोन महिन्यांनंतर शटर उघडले
गेल्या दोन महिन्यांपासून मोबाइल विक्री आणि दुरुस्तीचा व्यवसाय ठप्प होता. तब्बल दोन महिन्यांनंतर दुकानाचे शटर उघडले असून, दुकान सुरू झाल्यापासून ग्राहकांची गर्दी सुरू झाली आहे. नवीन मोबाइल खरेदीसोबतच दुरुस्तीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.
- आदित्य शाह, मोबाइल विक्रेता.
मोबाइल दुरुस्तीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी गर्दी करू नये, असे वारंवार सांगूनही ग्राहकांची गर्दी होत आहे. दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे, परंतु ग्राहकांनी दुकानासमोर गर्दी करू नये, गर्दी होऊन पुन्हा दुकाने बंद करण्याची वेळ आली, तर व्यावसायिकांना ते परवडणारे नाही.
- आशिष पटेल, मोबाइल विक्रेता
----