मोदी सरकार राज्यघटना बदलण्याच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:41 AM2017-11-27T00:41:16+5:302017-11-27T00:44:55+5:30
देशवासीयांना कॉँग्रेसने राज्य घटनेच्या माध्यमातून हक्क आणि अधिकार मिळवून दिले. त्याच हक्कात मोदी सरकार हस्तक्षेप करीत आहेत. आरक्षणाचा फेरविचार करण्याचे आवाहन वारंवार राष्टÑीय स्वयंसेवक संघ करीत आहे.
नाशिक : देशवासीयांना कॉँग्रेसने राज्य घटनेच्या माध्यमातून हक्क आणि अधिकार मिळवून दिले. त्याच हक्कात मोदी सरकार हस्तक्षेप करीत आहेत. आरक्षणाचा फेरविचार करण्याचे आवाहन वारंवार राष्टÑीय स्वयंसेवक संघ करीत आहे. शिवाय विविध कायदे बदलून देशातील सर्वोत्तम घटनाच बदलण्याचा घाट सरकार करीत आहे. अशावेळी राज्यघटना वाचविण्यासाठी संघर्ष करण्याची गरज असल्याचे मत कॉँग्रेसचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांनी व्यक्त केले.
नाशिक शहर जिल्हा कॉँग्रेसच्या वतीने येथील हॉटेल पंचममध्ये संविधान दिनानिमित्त मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. विदेशी नेत्यांच्या तालावर चालणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी व्यासपीठावर कॉँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, भाई नगराळे, डी. जी. पाटील, माजी राज्यमंत्री डॉ. शोेभा बच्छाव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. काल-परवा उदयास आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात गेली साठ वर्षे सत्ता असलेल्या कॉँग्रेसने काय केले, असा वारंवार प्रश्न करतात. मात्र देशाला घटना देणाºया कॉँग्रेसने सर्वसामान्यांच्या हितासाठी राज्य घटना दिली आणि बॅँकेच्या राष्टÑीयीकरणापासून पंचायत राज व्यवस्थेपर्यंत तसेच यूपीए सरकारनेही रोजगार, शिक्षणाचा हक्क दिला. परंतु हेच अधिकार आता मोदी हटविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप करून मोहनप्रकाश यांनी देशातील नागरिकांनी शाकाहार करावा हेदेखील आता सरकार ठरवित आहे. धर्मनिरपेक्षता, जाती निर्मूलन या सर्वच चौकटींना मोडले जात आहे. आरक्षणाची समीक्षा करा, असे वारंवार सांगितले जात आहे. तर अगदी ग्रामपंचायतीसाठीदेखील शिक्षणाची अट टाकून राजकीय हक्क डावलले जात आहेत, असेही ते म्हणाले. नोटाबंदी, जीएसटी हे निर्णय विदेशी नेत्यांच्या सूचनेनुसार घेतले जात आहेत. अशाप्रकारच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था देशोधडीला लागली असून, सर्व बॅँका एनपीएत गेल्या आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी शरद रणपिसे, विनायक देशमुख, भाई नगराळे आणि आमदार निर्मला गावित यांनी मनोगतात केंद्रातील भाजपा सरकारच्या कामकाजावर टीका केली. स्वागत शहराध्यक्ष शरद अहेर यांनी करताना शहर कॉँग्रेसच्या कामाचा आढावा घेतला. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी सरकारच्या विरोधात चले जाव आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर शाहू खैरे, डॉ. तुषार शेवाळे, डॉ. ममता पाटील, राहुल दिवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. आरएसएसच्या नागपूर येथील मुख्यालयावर कधीही तिरंगा फडकवला जात नव्हता आणि देशात लालकिल्ला किंवा अन्यत्र तिरंगा फडकविण्याची भाषा केली जात होती. सेवादलाचे आंदोलन आणि न्यायालयाच्या आदेशानुसार संघ कार्यालयावर तिरंगा फडकावा लागला. जे कार्यालयावर तिरंगा फडकवीत नव्हते आणि ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले नाही, शिवाय गांधी हत्येनंतर मिठाई वाटली, असे संघाचे लोक आज राष्टÑवादाचे अजब धडे देत असल्याची टीका मोहनप्रकाश यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी नोटबंदी केली आणि दुसºयाच दिवशी जपानच्या पंतप्रधानांना भेटले. त्यानंतर जीएसटी लागू करताना देशाला जणू स्वातंत्र्य मिळाले, असा उत्सव करण्यात आला आणि दुसºयाच दिवशी मोदी अमेरिकेच्या अध्यक्षांना आलिंगन देऊन भेटले. पूर्वी विदेशातील नेत्यांना हस्तांदोलन केले जात. आता मोदी यांनी झप्पी देण्याची नवी प्रथा आणली आहे. मोदी यांची ही झप्पी देशवासीयांना मात्र त्रासदायक ठरते आहे. कारण विदेशी नेत्यांच्या सांगण्यावरून नोटाबंदी आणि जीएसटीचे निर्णय घेतले गेले, असा आरोप मोहनप्रकाश यांनी केला.