पंचवटीतील मठ, मंदिरांत गुरु पौर्णिमा साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 12:03 AM2020-07-06T00:03:46+5:302020-07-06T00:04:16+5:30
पंचवटी परिसरातील विविध ठिकाणी असलेल्या देवदेवतांच्या मंदिरात कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सिंग पाळत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
पंचवटी : पंचवटी परिसरातील विविध ठिकाणी असलेल्या देवदेवतांच्या मंदिरात कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सिंग पाळत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. पेठरोड येथील कैलास मठ भक्तिधाम येथे रविवारी सकाळी कैलास मठाचे महंत स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या हस्ते गुरू प्रतिमापूजन, अभिषेक पूजन व महाआरती करण्यात आली.
साध्या पद्धतीने यंदा गुरु पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी मोजक्या भाविकांनी हजेरी लावली होती. सकाळी मुख्य मंदिरात पूजन करून अभिषेक करण्यात आला. यावेळी उपस्थित ब्रह्मवृंदानी पौरोहित्य केले. जुना आडगावनाका येथील पंचमुखी हनुमान मंदिरातदेखील कोरोना पार्श्वभूमीवर बोटावर मोजता येईल इतक्या हनुमानभक्तांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. सकाळी महंत भक्तिचरणदास महाराज यांच्या हस्ते पंचमुखी हनुमान मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात येऊन अभिषेक, हवन करण्यात आला. त्यानंतर आद्य जगद््गुरू रामानंदचार्या महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती झाली. यावेळी उपस्थित साधू-महंतांनी आपाल्या गुरुंचे पूजन केले. यावेळी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. श्रीकृष्ण तीर्थ आश्रमात यंदा साध्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. सकाळी स्वामी रामतीर्थ महाराज यांच्या हस्ते मंदिरात पूजन व महाआरती करण्यात आली. औरंगाबादरोडवरील संत जनार्दन स्वामी आश्रमात गुरुपूजन सोहळा संपन्न झाला. सिद्धिविनायक मानवकल्याण मिशनच्या वतीने गुरूपूजन व यावेळी स्वामी डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांचा फेसबुक पेजवर लाइव्ह आशीर्वचन सोहळा पार पडला.