हरलेल्या रमीचे पैसे न दिल्याने वसुलीसाठी बळजबरीने घेतला धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 01:47 AM2018-11-01T01:47:00+5:302018-11-01T01:47:17+5:30
बेकायदेशीर क्लबवर पत्ते खेळण्यासाठी गेलेल्या इसमाने हरलेल्या रमीचे पैसे न दिल्याने त्यास धमकावून बळजबरीने त्याच्या खिशातून धनादेश काढून घेतल्याची घटना गंगापूर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आनंदवलीमध्ये पाच दिवसांपूर्वी घडली़
नाशिक : बेकायदेशीर क्लबवर पत्ते खेळण्यासाठी गेलेल्या इसमाने हरलेल्या रमीचे पैसे न दिल्याने त्यास धमकावून बळजबरीने त्याच्या खिशातून धनादेश काढून घेतल्याची घटना गंगापूर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आनंदवलीमध्ये पाच दिवसांपूर्वी घडली़ विशेष म्हणजे घटनेनंतर चार दिवसांनी गंगापूर पोलिसांनी संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून घेतला व पाच दिवसांनंतर अर्थात बुधवारी (दि़ ३१) या क्लबवर छापामारी करून २१ जुगारींना ताब्यात घेतले़ गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत चोरी, घरफोडी, लुटीचे प्रकार घडत असून, याकडे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष देण्याची मागणी केली जाते आहे़
त्रिमूर्ती चौकातील अमोल फुले-भालेराव याने गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार २७ आॅक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरील आनंदवलीतील स्वानंदराज संकुल, रॉयल बेकर्सवर ओम साईनाथ मित्रमंडळ ठाण्यामार्फत चालविल्या जाणाºया मनोरंजन क्लबमध्ये पत्ते खेळण्यासाठी गेला होता़ यावेळी संशयित शेरू (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) व रिझवान जब्बार खान यांनी हरलेल्या पॉइंट रम्मीचे दहा हजार रुपये दिले नाही या कारणावरून कुरापत काढून हातपाय तोडू अशी धमकी दिली़ तसेच भालेराव याच्या खिशातील स्टेट बँक आॅफ इंडियाचा १५ हजार रुपयांचा धनादेश जबरदस्तीने काढून घेतला़
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात ३० आॅक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तर बुधवारी (दि़ ३१) या क्लबवर गंगापूर पोलिसांनी छापा टाकून २१ जुगाºयांना अटक केली़ यापैकी काहींना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, उर्वरित नऊ जुगाºयांची न्यायालयीन कोठडीत अर्थात नाशिकरोड कारागृहात रवानगी करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे ठाणे धर्मादाय आयुक्तांची सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजन केंद्राच्या नावाखाली अध्यक्ष गंगाराम लक्ष्मण गायकवाड आपल्या चार साथीदारांसह हा क्लब चालवित होता़ संशयित गायकवाड स्थानिक लोकप्रतिनिधीचा जवळचा नातेवाईक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़
चेनस्नॅचिंग, घरफोडी, जबरी लुटीच्या घटना
गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत दहा दिवसांच्या कालावधीत घरफोडी, फसवणूक, जबरी चोरी यामध्ये २७ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे़ वनविहार कॉलनीत वृद्धेचे १ लाख १२ हजार रुपयांचे दागिने, प्रमोदनगरमध्ये विशाल अग्रवाल यांच्या कार्यालयाच्या खिडकीचे गज कापून ६ लाखांची रोकड, प्रसाद सर्कलजवळील मोबाइल दुकान फोडून १६ लाखांचे मोबाइल, आकाशवाणी टॉवरजवळ पादचारी महिलेची ३० हजारांची पोत, दोन घरफोड्यांमध्ये तीन लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे़
पोलिसांची दादागिरी
गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याऐवजी मेडिकलचालकावर दादागिरी करण्यात मोठे शौर्य गाजविल्याचा आविर्भाव आहे़ या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शोध पथक नेमके काय काम करते याचा आढावा वरिष्ठांकडून घेतला जातो की नाही याबाबतही साशंकता आहे़