नाशकात पेस्टकंट्रोलचे मासिक वेळापत्रक संकेतस्थळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 06:51 PM2018-03-12T18:51:08+5:302018-03-12T18:51:08+5:30
महापालिका : तक्रारींनंतर ठेकेदाराकडून विभागनिहाय नियोजन
नाशिक : शहरात डास प्रतिबंधक धूर व औषध फवारणीबाबत नगरसेवकांपासून नागरिकांपर्यंत नेहमीच ओरड होत असल्याने आयुक्तांच्या आदेशान्वये आता आरोग्य विभागाने धूर फवारणीचे मासिक वेळापत्रकच निश्चित करत ते महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकले आहे. त्यामुळे आपल्या भागात कोणत्या दिवशी धूर फवारणी होणार आहे, याची माहिती नागरिकांना समजण्यास मदत होणार आहे.
महापालिकेने पेस्ट कंट्रोलचा ठेका दिग्विजय एंटरप्रायझेस या कंपनीला दिलेला आहे. ठेकेदाराकडून प्रभागात डास प्रतिबंधक धूर व औषध फवारणी होतच नाही, अशी तक्रार नेहमीच नगरसेवकांपासून नागरिक करत आलेले आहेत. महासभा, स्थायी समितीपासून ते प्रभाग समित्यांच्या सभांमध्ये नगरसेवकांकडून याबाबत वेळोवेळी आवाज उठवला जातो. सदर ठेकेदाराची नियुक्ती ही न्यायालयाच्या आदेशान्वये झाल्याने मागील वर्षात स्थायी समितीच्या सभांमध्ये सदर ठेका रद्द करण्याची मागणी वारंवार नगरसेवकांनी केली होती शिवाय, सभापतींनीही ठेका रद्दची अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले होते. आरोग्य विभागाकडून ठेकेदाराची पाठराखण केली जात असल्याचाही आरोप केला गेला होता. दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आरोग्य विभागाच्या कामकाजाविषयी आढावा घेतला असता, पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदाराकडून धूर फवारणीचे वेळापत्रक निश्चित करून घेत ते सर्व लोकप्रतिनिधींसह नागरिकांनाही कळावे यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार, संबंधित ठेकेदाराने सहाही विभागांकरिता धूर फवारणीचे नियोजन केले असून, रविवार सुटीचा दिवस वगळता निश्चित केलेल्या भागात सायंकाळी ५ ते रात्री ९ या कालावधीत धूर फवारणी केली जात आहे. मागील वर्षी डेंग्यूच्या आजारामुळे नाशिककरांमध्ये भयाचे वातावरण होते. डेंग्यू वाढण्यास ठेकेदारच कारणीभूत असल्याचाही आरोप केला गेला होता. आता फवारणीचे नियोजन केल्याने डेंग्यूसह अन्य आजारांवर नियंत्रण येण्यास मदत होणार असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
तक्रारही करता येणार
धूर फवारणीचे विभागनिहाय व प्रभागनिहाय वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, मार्च महिन्याचे वेळापत्रक महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे. त्यामुळे नगरसेवकांसह नागरिकांना धूर फवारणी कधी होणार हे कळणार आहे. मात्र वेळापत्रकानुसार धूर फवारणी न झाल्यास नागरिकांसह नगरसेवकांना महापालिकेच्या अॅपवर तक्रार नोंदवता येणार आहे.