सिन्नर (नाशिक) : तालुक्यातील मोह शिवारात ३० वर्षींय विवाहितेने दहा वर्षाची मुलगी व आठ वर्षाच्या लहान मुलासह पाझर तलावात आत्महत्या केल्याची घटना सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मयत विवाहितेच्या भावाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीहून पती, सासरा, सासू, दीर व जाव अशा पाच जणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पती, सासरा व सासू या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
ज्योती विलास होलगिर (३०), गौरी विलास होलगिर(१०) व साई विलास होलगिर(८) रा. मोह ता. सिन्नर असे मृत तिघांची नावे आहेत. हे तिघेही काल (दि. १) शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता निघून गेल्याची खबर सासरे पांडुरंग होलगिर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. रविवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास ज्योती होलगिर, गौरी आणि साई या तिघांचे मृतदेह मोह शिवारातील पाझर तलावात मिळून आले.
पोलीस पाटील भाऊराव बिन्नर यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानंतर तिनही मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी मयत विवाहितेचा भाऊ सुनील चिंधू सदगीर (२६) रा. हिसवळ ता. नांदगाव याने मयत ज्योतीच्या सासरच्या पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. सासरच्या लोकांकडून लग्न झाल्यापासून माहेरुन एक लाख रुपये आणावे या कारणासाठी शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी पती विलास पांडुरंग होलगिर, सासरा पांडुरंग कारभारी, सासू फशाबाई, दीर अमोल व जाव सुनिता अमोल होेलगिर या पाच संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पती विलास, सासरा पांडुरंग व सासू फशाबाई या तिघांना अटक केली आहे. दरम्यान, मोह येथे मयत विवाहिता ज्योती, मुलगी गौरी व मुलगा साई या तिघांवर अंत्यसंकार करण्यात आले.पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक टी. एस. गरुड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव गायकवाड, हवालदार मनेश मानकर, प्रकाश उंबरकर, शशिकांत निकम, रोशन गायकवाड अधिक तपास करीत आहेत.