अभ्यास करत नसल्याने पोटच्या मुलाचा आईने उशीने दाबला गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 01:31 AM2021-08-11T01:31:05+5:302021-08-11T01:31:50+5:30
मातृत्वाच्या नात्याला काळीमा लावणारी घटना शहरातील इंदिरा नगर भागात घडल्याचे उघडकीस आले आहे. अवघ्या साडेतीन वर्षाचा चिमुकला ऑनलाइन अभ्यास करत नाही, या क्षुल्लक कारणावरून आलेला राग मातेला अनावर होतो अन् ती उशीने आपल्या बेडरुममध्ये मुलाचे तोंड दाबून त्याचा श्वास कायमचाच थांबविते अन् त्यानंतर स्वत:ही गळफास घेत जीवन संपविते, अशी काळीज पिळवटून टाकणारी घटना पोलिसांच्या तपासातून उघडकीस आल्याने हळहळ अन् संताप व्यक्त होत आहे. पाथर्डी फाटा भागातील सोमवारी (दि.९)
नाशिक : मातृत्वाच्या नात्याला काळीमा लावणारी घटना शहरातील इंदिरा नगर भागात घडल्याचे उघडकीस आले आहे. अवघ्या साडेतीन वर्षाचा चिमुकला ऑनलाइन अभ्यास करत नाही, या क्षुल्लक कारणावरून आलेला राग मातेला अनावर होतो अन् ती उशीने आपल्या बेडरुममध्ये मुलाचे तोंड दाबून त्याचा श्वास कायमचाच थांबविते अन् त्यानंतर स्वत:ही गळफास घेत जीवन संपविते, अशी काळीज पिळवटून टाकणारी घटना पोलिसांच्या तपासातून उघडकीस आल्याने हळहळ अन् संताप व्यक्त होत आहे.
पाथर्डी फाटा भागातील सोमवारी (दि.९) साई-सिद्धी अपार्टमेंटमधील राहत्या घरात शिखा सागर पाठक (३२) हिने आई-वडील हॉलमध्ये बसलेले असताना स्वत:च्या बेडरूमचा दरवाजा बंद करून घेत गळफास लावून आत्महत्या केली तसेच आत्महत्या करण्यापूर्वी मुलगा रिधानचा उशीने गळा दाबून खून केला. पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. मृतदेहांजवळ पोलिसांना एक सुसाइड नोटदेखील लिहिलेली आढळून आली होती. या घटनेने पाथर्डीफाटा परिसरात खळबळ उडाली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. महिलेच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय असेल? आणि मुलगा रिधानचा कसा मृत्यू झाला, याबाबत तर्कवितर्क लावले जात असताना मंगळवारी या मायलेकाच्या मृत्युचे गुढ उकलले. पोलिसांनी या घटनेचा बारकाईने तपास करत छडा लावला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपासाला गती दिली. मंगळवारी दुपारी या घटनेमागील गूढ पोलिसांनी संपुष्टात आणले. मृत शिखा यांच्यावर इंदिरा नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी सांगितले.
---इन्फो---
आजी-आजोबांसह चिमुकल्याचे वडीलही हादरले
मुलगा रिधान याने अभ्यास करावा, हुशार व्हावे, यासाठी शिखा सतत त्याला बाेलत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. बराच वेळ होऊनही मुलगी आणि नातू घरातून बाहेर येत नाही म्हणून तिच्या आई-वडिलांनी आरडाओरड करत जोरजोराने दार वाजविण्यास सुरुवात केली. शेवटी सागर पाठक यांनी दार ताेडले असता मायलेक मृतावस्थेत आढळून आल्याने या तिघांनाही मोठा धक्का बसला.
---इन्फो---
सुसाइड नोटमध्ये कोणाविषयी तक्रार नाही
मायलेकांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना आढळून आलेल्या सुसाईड नोटमध्ये कुठल्याही व्यक्तीविरुद्ध तक्रार करण्यात आलेली नव्हती. मृत्युपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीमधील मजकूर आणि घरातील व्यक्तींशी केलेल्या चर्चेतून तसेच शवविच्छेदन अहवालावरून पोलिसांनी तपास करत प्रत्यक्ष घटनास्थळावरील परिस्थितीनुसार शिखाने मुलाची हत्या करून नंतर स्वत: आत्महत्या केल्याचे निष्पन्न केले आहे.