नाशिक : पंचवटीतील एका वृद्धेला कोरोना संसर्ग झाला. तीन दिवस महापालिका व खासगी रुग्णालयात शोधाशोध करूनही बेड मिळाला नाही. त्यात संसर्ग वाढत गेला व त्या वृद्धेचा मृत्यू झाला, परंतु दुर्दैव येथेच संपले नाही, अंत्यसंस्काराला नेेण्यास पालिकेची एक शववाहिका किंवा रुग्णवाहिकाही उपलब्ध झाली नाही. नगरसेविकांच्या मध्यस्थीने नोडल ऑफिसरने प्रमाणपत्र देण्याची तयारी केली, परंतु तेथे प्रत्यक्ष मृतदेह आणण्यास सांगण्यात आल्याने, संबंधित मृत वृद्धेच्या मुलीने कारमध्ये मृतदेह ठेवून तो मेरीपर्यंत नेला व त्यानंतर तेथे रुग्णवाहिका उपलब्ध झाली. त्यानंतर, त्या वृद्धेचा अमरधामकडे अखेरचा प्रवास सुरू झाला. आडगाव नाका परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील वृद्धा गेल्या तीन दिवसांपासून बाधित असल्याने, तिच्या उपचारासाठी कुटुंबीयांची धावपळ सुरू होती. तीन दिवस पाठपुरावा करूनही कोठेही बेड मिळाला नाही. अखेर घरीच त्या वृद्धेचा अंत झाला.
- मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याचे ठरविल्यानंतर शववाहिका उपलब्ध होईना. त्यामुळे संबंधितांनी परिसरातील नगरसेविका प्रियांका माने यांच्याशी संपर्क साधला. त्या आणि त्यांचे पती धनंजय माने यांनी महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात सकाळपासून अनेकदा संपर्क साधला. मात्र, शववाहिका तर उपलब्ध नाहीच, परंतु रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नव्हती. एका रुग्णवाहिका चालकाशी माने यांचा संपर्क झाला, परंतु गाडी येत असताना रस्त्यातच ती फेल झाली. - मृतदेह अमरधाममध्ये नेल्यानंतर सर्वप्रथम डॉक्टरांनी दिलेला मृत्यूचा दाखला तपासला जातो, परंतु येथे तर दाखला मिळण्याचीही अडचण! अखेरीस महापालिकेच्या मेरी येथील कोविड सेंटरमध्ये असलेल्या डॉक्टरांशी माने यांनी संपर्क साधला आणि त्यांना प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शविली. - मात्र, कोविड झाल्याचे पुरावे आणि मृतदेह बघून प्रमाणपत्र देण्याचे मान्य केले. त्यानुसार, मृतदेह मेरी येथील कोविड सेंटरमध्ये नेण्याचे ठरले, परंतु पुन्हा रुग्णवाहिकेचा प्रश्न निर्माण झाला. अखेरीस त्या वृद्धेच्या मुलीने मोटारीत मृतदेह ठेवला आणि तो मेरीपर्यंत नेला. तेथे डॉक्टरांनी सर्व तपासून मृत्यूचा दाखला दिला आणि रुग्णवाहिकाही दिली.