नाशिक : बालकासाठी आईचे दूध हे जीवनदायी पोषक तत्त्वे प्रदान करणारे अमृत असते. त्यामुळे त्या दुधापासून कोणतेही बालक वंचित राहू नये, यासाठी ही मानवी दुधाची बँक मोठे योगदान देऊ शकेल, असा विश्वास आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या उपस्थितीत जिल्हा रुग्णालयात मानवी दूध बँकेचा शुभारंभ झाला.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, एमएसएल ड्राइव्हलाइनचे भूषण पटवर्धन, राेटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा डॉ. श्रीया कुलकर्णी, मंगेश अपशंकर, कमलाकर टाक, विजय दिनानी, सागर भदाणे, डॉ. हितेंद्र महाजन, ओमप्रकाश रावत, प्रफुल्ल बरडिया आदी मान्यवर उपस्थित होते. बाळाच्या जन्मापासून ते सहा महिने वयापर्यंत केवळ आईचेच दूध बाळास पाजणे आवश्यक असते. मात्र, काही प्रसंगात बाळाच्या जन्मावेळी मातेचा मृत्यू, अकाली अर्भक किंवा काही गुंतागुंतीमुळे आईचे दूध अपुरे मिळणे, अशा अनेक कारणांमुळे बालके वंचित राहू शकतात. त्यासाठी एकमेव उपाय म्हणून इतर मातेचे दूध अर्भकाला उपलब्ध करून देण्यात आल्याचे डॉ. कानिटकर यांनी नमूद केले. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे दूध काढणे, त्याची चाचणी घेणे आणि नंतर ते कुपोषित किंवा गरजू अर्भकाला देणे शक्य झाल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. हे दूध दान करण्यास इच्छुक असलेल्या स्तनदा मातांना एकत्र आणते, ते शास्त्रोक्त पद्धतीने साठवते आणि नंतर ज्यांना त्याची नितांत गरज आहे अशा बालकांना ते देण्याने एक जीव वाचू शकतो किंवा कुपोषित बनण्यापासूनही बचावतो, असा सूरदेखील यावेळी व्यक्त करण्यात आला.
फोटो
१९मिल्क बँक