एकलहरे : येथील संच क्रमांक ३-४-५ वीज नियामक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे जानेवारी २०२१पर्यंत टप्प्या टप्प्याने बंद करण्याचे प्रस्तावित आहे. या निर्णयाविरोधात एकलहरेच्या सर्व कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार सोमवारपासून आठ दिवस काळ्या फिती लावून काम करण्यात येणार आहे. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दुपारी १२ वाजता वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत द्वारसभा घेतली. यावेळी शासनाच्या प्रकल्पविरोधी भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. खासगी कंपन्यांसाठी हा प्रकल्प बंद करण्याचा शासनाचा डाव असून, तो हाणून पाडण्यासाठी सर्व कामगार व इतर घटकांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे आवाहन युनियन पदाधिकाºयांनी केले. यावेळी ज्ञानेश्वर डोंगरे, विठ्ठल बागल, सुयोग झुटे, सीताराम चव्हाण यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. पुन्हा दि. २३ रोजी द्वारसभा घेण्याचे ठरविण्यात आले. यावेळी विनायक क्षीरसागर, सुभाष कारवाल, प्रभाकर रेवगडे, प्रफुल्ल कुलकर्णी, राहुल शेळके, नारायण देवकर, यांच्यासह कामगारवर्ग उपस्थित होते.एकलहरा औष्णिक वीज केंद्राचे १४० मेगावॉटचे दोन संच २०११ मध्ये बंद केले. त्याबदल्यात ६६० मेगावॉटचा प्रकल्प मंजूर करण्यात आला. मात्र तो प्रत्यक्ष सुरू न करता आहे तेच तीन संच बंद करण्याचा घाट घातला जात आहे. या निर्णयाचा निषेध करून,जोपर्यंत ६६०चा प्रकल्प सुरू होत नाही तोपर्यंत जुन्या संचातील धूर बंद होऊ देणार नाही. अशी भूमिका कृती समितीने घेतली.
एकलहरे वीज केंद्र बंद करण्याच्या निषेधार्थ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:23 AM