नाशिक : रुपी बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदार हित संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली असून, येत्या २ नोव्हेंबरला बँकेच्या रेडक्रॉस सिग्नलवरील शाखेत आंदोलन केले जाणार आहे़ रविवारी (दि़२५) हुतात्मा स्मारकात झालेल्या रुपी बँक ठेवीदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़बँकेच्या बड्या कर्जदारांची यादी प्रसिद्ध करा, ठेवीदारांची माहिती द्या, ठेवीदारांच्या रकमा परत करा या, अशी मागण्या यावेळी करण्यात आला़ तसेच बँकेच्या शंभर बड्या कर्जदारांची यादी तयार करून त्यांच्या घरांवर आंदोलन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. तसेच बँक बुडाल्याची दखल न घेणाऱ्या आमदार, खासदार व मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. नागरी सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँक वा राज्य शासन यांचे दुहेरी नियंत्रण असते़ मात्र बँका बंद पडेपर्यंत सरकार काय करते, असा सवाल ठेवीदारांनी केला़शासनाने याबाबत नैतिक जबाबदारी स्वीकारून ठेवीदारांचे पैसे परत करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या बैठकीस सीटूचे सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, भाकपचे राजू देसले, ठेवीदार विनायक येवले, श्रीकृष्ण शिरोडे, इ. एन. कुलकर्णी, नितीन गायधनी, शशिकांत जहागिरदार यांसह ठेवीदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)हुतात्मा स्मारकातील रुपी बॅँक ठेवीदारांची बैठक.
रुपी बँक ठेवीदारांचे २ नोव्हेंबरला आंदोलन
By admin | Published: October 25, 2015 11:53 PM