नायगाव : महावितरण कंपनीच्या बदललेल्या थ्री फेज वेळापत्रकावर नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सकाळच्या सत्रातील वेळापत्रक बदलण्याची मागणी पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे.दिवसभर शेतात लागवड केलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा थ्री फेज वीजपुरवठ्याची गरज असते. मात्र काही भागात तीन तर काही भागात चार दिवस थ्री फेज पुरवठा केला जातो. या वेळापत्रकात रात्रीच्या थ्री फेजचा सकाळी ( ६.४० ) पर्यंतच्या वेळेवर शेतकरी नाराज आहे. हीच वेळ बदलून किमान सकाळी दहा वाजेपर्यंत वीजपुरवठा वाढविण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.सध्या असलेल्या सकाळच्या वेळेत शेतकऱ्यांना कुठलाच फायदा होत नसल्यामुळे पिकांना पाणी देण्याबरोबरच वाडी-वस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना पिण्याचे व जनावरांच्या पाणी साठविण्यासाठी हे वेळापत्रक सध्या डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे महावितरणने या वेळेत त्वरित बदल करून शेतकऱ्यांना दिलास देण्याची मागणी नायगावचे माजी सरपंच भाऊसाहेब लोहकरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.--सध्या सर्वत्र विविध पिकांच्या लागवडीची लगबग सुरू आहे. लागवड केलेल्या पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी सर्वच भागात किमान दहा तास थ्री फेज वीजपुरवठा गरजेचा आहे. अशा परिस्थितीत देशवंडी फीडरवर तीनच दिवस थ्री फेज वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना विहिरीत पाणी असूनही पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही ही शोकांतिका आहे.- दत्ताराम डोमाडे, शेतकरी, देशवंडीकृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना कधी पाणीटंचाई कधी अवकाळी तर कधी बदलत्या हवामानाबरोबर विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागतो आहे. येत्या आठवडाभरात सुधारित वेळापत्रक जाहीर केले नाही तर नायगाव खोऱ्यातील शेतकरी आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे.- भाऊसाहेब लोहकरे. माजी सरपंच. नायगाव