पूर ओसरल्यानंतर चिखलाचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 01:17 AM2019-08-06T01:17:42+5:302019-08-06T01:18:04+5:30
गोदावरी व दारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे रविवारी नाशिक तालुक्यातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, मोहगाव, जाखोरी, हिंगणवेढा, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी या गावांना पुराचा बसलेला फटका सोमवारी काही प्रमाणात ओसरला.
एकलहरे : गोदावरी व दारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे रविवारी नाशिक तालुक्यातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, मोहगाव, जाखोरी, हिंगणवेढा, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी या गावांना पुराचा बसलेला फटका सोमवारी काही प्रमाणात ओसरला. पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली असून, गावांमध्ये शिरलेले पाणी ओसरू लागल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. दरम्यान, गोदावरीच्या पुरात एक इसम वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गोदावरीच्या रविवारच्या महापुरामुळे लाखलगाव येथील स्थलांतरित कुटुंबांची राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीच्या बचतगट हॉलमध्ये व माधवराव बोरस्ते हायस्कूलमध्ये करण्यात आली होती. रविवारपासून दोन दिवस ग्रामपंचायतीच्या वतीने पूरग्रस्तांच्या जेवण-खानाची व्यवस्था ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली. यासाठी सरपंच स्वाती हिले, ग्रामविकास अधिकारी के. एम. बरू, तलाठी मनीषा पाटील यांनी स्थलांतरिताना दिलासा दिला. रविवारी हिंगणवेढा, जाखोरी या गावांना पुराच्या पाण्याने दिलेला वेढा पाणी ओसरल्याने सुटला असला तरी, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. जाखोरीच्या तीनही बाजूंनी दारणेच्या पाण्याचा विळखा आहे.
अन्नधान्याचे नुकसान
जुने सामनगावात दारणाच्या पुराचे पाणी शिरल्याने व चाडेगावकडून सामनगाव गावठ्याकडे पुराचे पाणी राजवाड्यापर्यंत आल्याने नवीन व जुने सामनगावातील संपर्क तुटला. दारणा काठावरील जुने सामनगावच्या स्मशानभूमीचे पत्रे पाण्यात वाहून गेले. कोटमगाव रस्त्यावर आलेले पाणी काही प्रमाणात ओसरले असले तरी अजूनही वाहतूक बंदच आहे. या रस्त्यालगत पुराचे पाणी तुकाराम दामू जगताप, अनंतराव विठ्ठल जगताप, बाळासाहेब ढोकणे, कटाळे यांच्या घरात पाणी शिरल्याने घरसामान व अन्नधान्याचे नुकसान झाले.