नाशिक महापालिकेत सध्या चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत भाजपाला फायदा झाला. पक्षाचे ६६ नगरसेवक असून यंदा सर्वाधिक याच पक्षाकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे संघटनही चांगले असल्याने त्यांच्याकडे देखील प्रबळ दावेदार आहेत. अर्थात, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी झाल्यास त्याचा फटका भाजपाला बसू शकतो, त्यामुळे तीन सदस्य पद्धतीत महाविकास आघाडी होण्याची शक्यता अधिक आहे.
नाशिक महापालिकेत लाेकप्रतिनिधींची राजवट १९९२ मध्ये आल्यानंतर त्या वर्षी आणि त्यानंतर १९९७ मध्ये अशा दोन पंचवार्षिक निवडणुकीत एक सदस्यीय प्रभाग पद्धती होती;मात्र २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती अस्तित्वात होती. यावेळी भाजपा आणि शिवसेनेला लाभ झाला होता. या निवडणुकीत शिवसेनेला ३८ तर भाजपाला २२ अशा ६० जागा मिळाल्या आणि प्रथमच महापालिकेत युतीला पूर्ण बहुमत मिळाले होते. त्यानंतर पुन्हा २००७ मध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने लहान सहान पक्षांना महत्त्व वाढले. २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी देान सदस्यांचा प्रभाग होता, त्याच वेळी मनसेची लाट असल्याने मनसेला त्याचा काहीसा फायदा झाला;मात्र त्यावेळी मनसेचे ४० नगरसेवक निवडून आले असले तरी बहुमत मिळाले नव्हते. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी राज्यात भाजपाची सत्ता असल्याने त्यांनी चार सदस्यांचा प्रभाग अशी रचना केली आणि नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच या पक्षाचे ६६ नगरसेवक निवडून आले. विद्यमान सरकारने आता सुरुवातीला एक सदस्यीय प्रभागाची रचना असेल असे जाहीर केले; मात्र त्यानुसार प्रभाग रचनेला प्रारंभ झाला असला तरी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचा एक सदस्यीय पद्धतीला विरोध होता. विशेषत: दोन सदस्यीय प्रभाग तरी करावेत जेणेकरून आरक्षणानुसार ५० टक्के जागांवर महिला तर उर्वरित खुल्या गटात अन्य कार्यकर्त्यांना संधी मिळेल असे सांगितले जात होते. अखेरीस त्यात काही प्रमाणात यश आले असून आता तीन सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे.
इन्फो...
अपक्ष- छोट्या पक्षांना मोठा फटका
महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा छोट्या पक्षांना फटकाच बसत आला आहे. १९९२ मध्ये २७ तर १९९७ मध्ये १७ अपक्ष निवडून आले होते. २००२ मध्ये बहुसदस्य पद्धतीत अवघे ६ अपक्ष निवडून आले होते. अशाच प्रकारे २०१२ मध्ये व्दिसदस्यीय पद्धतीच्या वेळी ६ तर आता २०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धती तीन अपक्ष निवडून आले आहेत.
इन्फो...
काँग्रेस-राष्ट्रवादीला आधार मिळणार
नाशिक शहरात सध्या सेना-भाजप वगळता काँग्रेस- राष्ट्रवादी तसेच मनसेची अवस्था बिकट आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा नगरसेवक असून मनसेचे तर पाचच नगरसेवक आहेत. त्यामुळे बहुसदस्यीय प्रभाग पद्धती अस्तित्वात आल्यानंतर आता काँग्रेस- राष्ट्रवादीला आघाडीची गरज भासणार आहे.