मुंढे यांना कृतिशील निवृत्त अधिकारी संघटनेचे समर्थन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 01:49 AM2018-11-01T01:49:48+5:302018-11-01T01:50:02+5:30
नागपूर येथील महापौर परिषदेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासंदर्भात अवमानास्पद चर्चा केल्याने कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्थेने त्याचा निषेध केला असून, मुंढे यांचे समर्थन करताना त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक : नागपूर येथील महापौर परिषदेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासंदर्भात अवमानास्पद चर्चा केल्याने कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्थेने त्याचा निषेध केला असून, मुंढे यांचे समर्थन करताना त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, तुकाराम मुंढे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. नागपूर येथे नुकतीच राज्यातील महापौरांची परिषद पार पडली. यावेळी महपौरांच्या अधिकाराच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना आयुक्त तुकाराम मुंढे एककल्ली कारभार करीत असल्याचा आरोप करीत त्यांची कोणत्याही महापालिकेत नियुक्ती करू नये अशी मागणी करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेने अध्यक्ष सुभाषचंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने निवेदन दिले. वास्तविक प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असायला हवा, लाल दिवा म्हणजेच सत्ता कधीही जाऊ शकते; परंतु लालफीत म्हणजेच प्रशासकीय अधिकारी कायम राहतात. ही व्यवस्था घटनादत्त आणि स्थायी स्वरूपाची आहे. लोकशाहीत मालक नोकर असे लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांत संबंध नसावेत तर परस्पर सहकार्य, समन्वय आणि आदर असणे अपेक्षित आहे. अनियंत्रित राजसत्ता जनहिताला आणि निकोप लोकशाहीला मारक आहे याचे स्मरण करणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या राज्यात प्रशासकीय अधिकाºयाचे मनोधैर्य खच्ची करणे, नाउमेद करणे तसेच मानहानी करणे अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मुंढे यांच्या कामाचा गौरव
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तक्रार निवारणासाठी तयार केलेले ई-कनेक्ट अॅप, चुकीच्या कामांना केलेला विरोध, नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी सुरू केलेला वॉक विथ कमिशनर उपक्रम यांचे संघटनेने कौतुक करतानाच जनता त्यांच्या पाठीशी असल्याचे नमूद केले.