थकबाकीदार कर्मचाऱ्यांना मनपाचे अभय?
By Admin | Published: January 15, 2015 12:24 AM2015-01-15T00:24:58+5:302015-01-15T00:25:12+5:30
थकबाकीदार कर्मचाऱ्यांना मनपाचे अभय?
सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांवर जप्ती मोहीम तसेच नळ कनेक्शन बंदची कारवाई करण्यात येते; परंतु मनपामध्येच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडे गेल्या अनेक वर्षांपासूनची हजारो रुपयांची पाणीपट्टी थकीत असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. यामुळे थकबाकीतून
मनपा कर्मचाऱ्यांना अभय
देण्यात आले आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने दरवर्षी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थकबाकीदारांच्या मिळकत जप्तीची तसेच नळ कनेक्शन बंदची कारवाई करण्यात येते. या भीतीपोटी सर्वसामान्य नागरिक मनपाची थकबाकी भरतात; परंतु याच मनपामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चालक म्हणून कार्यरत असलेल्या मनपा कर्मचाऱ्याकडे गेल्या दहा ते बारा वर्षांपासूनची पाणीपट्टी थकीत असतानाही त्याच्यावर मनपाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
सदर मनपा कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या नावे ३१/१/२००४ पर्यंत सुमारे २३ हजार ९९१ रुपये इतकी थकबाकी आहे. विशेष म्हणजे, २००४ नंतर सदर कर्मचाऱ्यास अद्यापपर्यंत थकबाकीपोटी कुठलाही तगादा तर लावलेला नाहीच; परंतु २००४ पासून पुढील पाणीबिलही त्यांना पाठविले नसल्याचे समजते. सन २००९-१० मध्ये एकदा मनपाने नोटीस बजावली असून, यानंतर मात्र अद्यापही थकबाकी वसूल झालेली नाही. एकूणच मनपा कर्मचाऱ्यांकडील थकबाकीची वसुली न करता त्यांना अभय दिले जात असून, सर्वसामान्य नागरिकांना मात्र थकबाकीसाठी मनपाकडून तगादा लावण्यात येतो. यामुळेच घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीतून मनपा कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे. (वार्ताहर)