महापालिका निवडणूक : झेरॉक्स नगरसेवकांच्याही अपेक्षा उंचावल्या
By admin | Published: October 9, 2016 01:32 AM2016-10-09T01:32:19+5:302016-10-09T01:32:39+5:30
मातब्बरांचे वारसदार अजमावणार नशीब
नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या निवडणुकीत काही ज्येष्ठ नगरसेवकांसह मातब्बरांचे वारसदार नशीब अजमावण्याची शक्यता आहे. चालू पंचवार्षिक काळात झेरॉक्स नगरसेवक म्हणून संभावना होणाऱ्यांच्याही अपेक्षा चारसदस्यीय प्रभाग रचनेमुळे उंचावल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेत बव्हंशी नवीन चेहरे पहायला मिळण्याची शक्यता आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी ३१ प्रभागांकरिता आरक्षित जागा निश्चित झाल्यानंतर इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. अनेकांनी त्यानुसार मोर्चेबांधणी सुरू केली असून, जनसंपर्काला प्रारंभही झाला आहे. काही ज्येष्ठ नगरसेवकांनी निवडणूक न लढविता आपल्या वारसांना पुढे आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत. चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे एकाच घरातील दोन सदस्यही निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने, भाजपाच्या पाचही आमदारांच्या जागांवर त्यांच्या वारसांना संधी मिळणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यात, आमदार बाळासाहेब सानप यांचे सुपुत्र मच्छिंद्र सानप, सीमा हिरे यांची सुकन्या अथवा दीर, डॉ. राहुल अहेर यांची चुलत बहीण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाचे दिनकर पाटील यांच्या पत्नीऐवजी मुलगा अमोलची तर माजी महापौर दशरथ पाटील यांचे सुपुत्र प्रेम पाटील यांचीही राजकारणात एण्ट्री निश्चित मानली जात आहे. माजी आमदार वसंत गिते यांचे सुपुत्र प्रथमेश, राष्ट्रवादीचे शिवाजी चुंभळे यांचे सुपुत्र अजिंक्य गिते, माजी महापौर अशोक दिवे यांचे दुसरे सुपुत्र प्रशांत दिवे, भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांची सुकन्या संध्या कुलकर्णी यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमराव कांबळे यांनीही प्रकृती अस्वास्थ्यामुळे आता राजकारणातून निवृत्ती पत्करण्याचे ठरविले असून, त्यांचा वारसा सुपुत्र जॉय कांबळे यांच्याकडे आला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत जॉय यांना रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू झाली आहे. मातब्बरांच्या वारसांनी महापालिकेत येण्याची तयारी चालविली असतानाच चालू पंचवार्षिक काळात झेरॉक्स म्हणून संभावना होणाऱ्या इच्छुकांनाही निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यानुसार संबंधितांकडून प्रभागाची चाचपणी केली जात आहे. (प्रतिनिधी)दाम्पत्यांची संख्या वाढणार?चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे महापालिकेत नगरसेवक दाम्पत्यांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चालू पंचवार्षिक काळात महापालिकेत भाजपाचे दिनकर पाटील व कॉँग्रेसच्या लता पाटील, शिवसेनेचे सुधाकर बडगुजर व हर्षा बडगुजर आणि राष्ट्रवादीचे शिवाजी चुंभळे व कल्पना चुंभळे हे तीन दाम्पत्य नगरसेवक आहेत. येत्या निवडणुकीत लता पाटील, हर्षा बडगुजर व कल्पना चुंभळे यांच्याऐवजी त्यांचे वारसदार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर काही प्रभागांमध्ये पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा असल्याने नगरसेवक दाम्पत्यांची संख्या वाढणार की घटणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.