गणेशमूर्ती स्टॉल्ससाठी मनपाची मक्तेदारी अखेर संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 01:14 AM2019-08-22T01:14:42+5:302019-08-22T01:15:03+5:30
गणेशमूर्ती स्टॉल्ससाठी महापालिकेच्या इदगाह किंवा अन्य निर्देशित जागेवरच व्यवसाय करण्यासाठी असलेली सक्ती अखेरीस मोडीत निघाली आहे. महापालिकेच्या भाड्यापेक्षा कमी दर तसेच सुरक्षा आणि अन्य कारणांमुळे खासगी जागांवरच गाळे थाटण्यास पसंती देण्यात येत आहे.
नाशिक : गणेशमूर्ती स्टॉल्ससाठी महापालिकेच्या इदगाह किंवा अन्य निर्देशित जागेवरच व्यवसाय करण्यासाठी असलेली सक्ती अखेरीस मोडीत निघाली आहे. महापालिकेच्या भाड्यापेक्षा कमी दर तसेच सुरक्षा आणि अन्य कारणांमुळे खासगी जागांवरच गाळे थाटण्यास पसंती देण्यात येत आहे. त्यामुळे बुधवारी (दि. २१) झालेल्या लिलावात स्टॉल्सच्या लिलावाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागातील ५४३ स्टॉल्सचे बुधवारी (दि.२१) रेकार्ड लिलाव करण्यात आले. त्यात फक्त केवळ २२ स्टॉल्सचे लिलाव करण्यात आले आहेत. तर गेल्या वर्षी फक्त १३ स्टॉल्सचे लिलाव झाले होते. त्यामुळे महापालिकेचा मोठा महसूल बुडाला होता.
शहराच्या विविध भागात आणि रस्त्यांवर गणेश मूर्तींचे स्टॉल्स विक्रीसाठी असतात. त्यात पूर्वी नेहरू उद्यानाजवळ असणारे स्टॉल्स नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर भरू लागले. परंतु येथे शांतता क्षेत्र असल्याने ते गोल्फ क्लबलगतचे मैदान (इदगाह) थाटण्यास परवानगी दिली जाऊ लागली. परंतु कधी ईद तर कधी अन्य धार्मिक कारण पुढे करून व्यावसायिक अगोदरच रस्ता बळकावून बसत.
महापालिकेच्या परवानगीशिवाय काही राजकीय नेते गाळे तयार करून परस्पर भाड्याने देत. महापालिकेकडून नाममात्र भाडे देऊन त्यातील फायदा मात्र राजकीय व्यक्ती मिळवत असल्याने रस्त्यावर स्टॉल्स थाटण्यास महापालिकेने विरोध केला. परंतु परवानगीशिवाय एकदा स्टॉल थाटल्यानंतर त्यावरून चर्चा सुरू झाली की कारवाईबाबत महापालिका आणि पोलीस खाते एकमेकांवर जबाबदारी ढकलत असे. गेल्या वर्षी तर तत्कालीन आयुक्तांनी पंचवटीत तपोवन मैदानावर स्टॉल्स भाड्याने देण्याची तयारी केली. त्यानंतर इदगाह मैदानावर स्टॉल्ससाठी लिलाव झाले. परंतु विक्रेत्यांनी त्याकडे पाठ फिरवली आणि त्यानंतर पीटीसीसमोर एका खासगी जागेत स्टॉल्स थाटले.
दरम्यान, शहरात डोंगरे मैदान, बीवायके जवळील प्रिं. कुलकर्णी चौकासमोरील जागा तसेच गंगापूर रोडवरील खतीब डेअरीसमोरील जागा अशा अनेक ठिकाणी खासगी भूखंडांवर भाड्याने जागा घेऊन स्टॉल्स थाटले जात असल्याने आता बहुतांशी ठिकाणी महापालिकेच्या लिलावाला प्रतिसादच मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या ५४३ स्टॉल्सचे लिलाव केले त्यात नाशिक पूर्वमध्ये पंधरापैकी ५ स्टॉल्सला प्रतिसाद मिळाला. पंचवटीत ४३ पैकी १२ आणि सिडकोत २८ पैकी ५ स्टॉल्सला देकार मिळाले आहेत. मात्र पश्चिम विभागातील १४२, नाशिकरोडमधील २६५, सातपूरमधील ५० याठिकाणी स्टॉल्सला कोणताचा प्रतिसाद मिळाला नाही. व्दारका येथील गाळ्यांसाठी सर्वाधिक देकार ३९५० रुपयांचा मान्य झाला तर रासबिहारी आणि व्दारका येथील काही स्टॉल्ससाठी ३७०० रुपये इतका देकार लाभला.