धारदार शस्त्राने युवकाचा गळा चिरून खून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 01:45 AM2021-09-11T01:45:52+5:302021-09-11T01:47:06+5:30
जुन्या आडगाव नाक्यावरील रामरतन लॉजखाली असलेल्या बंद दुकानाजवळ एका ३० ते ३५ वयोगटातील अज्ञात युवकाचा अज्ञात मारेकऱ्यांनी कोणत्यातरी धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. हा खुनाचाच प्रकार दिसत असला तरी अधिकृतरीत्या पोलिसांनी केवळ संशय व्यक्त केला आहे.
पंचवटी : जुन्या आडगाव नाक्यावरील रामरतन लॉजखाली असलेल्या बंद दुकानाजवळ एका ३० ते ३५ वयोगटातील अज्ञात युवकाचा अज्ञात मारेकऱ्यांनी कोणत्यातरी धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. हा खुनाचाच प्रकार दिसत असला तरी अधिकृतरीत्या पोलिसांनी केवळ संशय व्यक्त केला आहे. वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. मृत्युमुखी पडलेल्या युवकाबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती धागेदोरे लागलेले नव्हते.
मिळालेल्या माहितीनुसार ज्या युवकाचा खून झाला तो युवक जीव वाचविण्याच्या प्रयत्नात सुरुवातीला काट्या मारुती पोलीस चौकीजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर धावत आला आणि त्यानंतर तेथून वाघाडीत पळत गेला व पुढे सेवाकुंज रस्त्यावर पळत जाऊन संघवी मिलच्या समोर एका डायग्नोस्टिक सेंटरजवळ रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडला. त्याला पडलेले बघितल्यानंतर काही नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळविले. यानंतर घटनास्थळी पंचवटी पोलीस दाखल झाले. त्यांनी त्या जखमी युवकाला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. या युवकाचा खून झाल्याचे सकृत्दर्शनी आढळले असले तरी त्याची अधिक माहिती उपलब्ध झाली नाही. तसेच त्याची हत्या झाली की, त्याने स्वतः गळ्यावर काही शस्त्र मारून घेतले, हे वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर सहायक पोलीस आयुक्त मधुकर गावित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सत्यवान पवार, योगेश मोरे, शेखर फरताळे आदींसह पंचवटी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता.