दारू न पाजल्याने डोक्यात पहार घालून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:16 AM2021-03-16T04:16:15+5:302021-03-16T04:16:15+5:30
येवला : तालुक्यातील सोमठाण जोश येथे दारू नाही पाजली या कारणावरून सहकाऱ्यांनी डोक्यात पहार, फावडे घालून निर्घृण खून ...
येवला : तालुक्यातील सोमठाण जोश येथे दारू नाही पाजली या कारणावरून सहकाऱ्यांनी डोक्यात पहार, फावडे घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रविवारी, (दि. १४) रात्री १० ते ११ वाजताच्या सुमारास सोमठाण जोश येथे विहिरीचे काम करण्यासाठी आलेल्या मजुरांमध्ये दारू पिण्यावरून वाद झाला. यात राजू राठोड (३५, रा. जिंतूर जि. परभणी) यास सहकारी संशयित दिलीप बाबुराव देवरे (रा. कुराड ता. पाचोरा जि जळगाव), दत्तू विश्वनाथ कोकाटे (रा. कोकणगाव ता. निफाड), देवराम एकनाथ जाधव (रा. पिंपळगाव बसवंत ता. निफाड), संतोष ऊर्फ विनायक पवार (रा. हिसवळ ता. नांदगाव) आदींनी दोरीने हातपाय बांधून त्याच्या डोक्यात हातापायावर लोखंडी पहार, फावडे आदींनी जबर मारहाण केली. यात राजू राठोड याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृतदेह घटनास्थळीच झाकून ठेवत सर्व सहकारी रात्रभर या मृतदेहासोबत झोपून राहिले.
सकाळी या घटनेची माहिती विहीर मालक तुकाराम विठोबा खरात यांना समजताच त्यांनी तात्काळ तालुका पोलिसांना दिली. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भावरी, सहायक निरीक्षक एकनाथ भिसे उज्ज्वलसिंह राजपूत, पोलीस शिपाई आबा पिसाळ, राजू चव्हाण, दीपक सांगळे, सतीश मोरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी चौकशीत सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या संशयितांना पोलिसीखाक्या दाखविताच खुनाच्या गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली. तालुका पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून, मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येवला येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.
दरम्यान, घटनास्थळी मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी भेट दिली असून, याप्रकरणी तालुका पोलिसांनी संशयितांविरुद्ध भादंवि ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे हे करीत आहेत.