येवला : केंद्राच्या तिहेरी तलाक विधेयकाविरोधात येवल्यात मुस्लीम महिलांनी बुधवारी मूक मोर्चा काढत प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले. सकाळी ११ वाजता पट्टनवाली मशिदीपासून आईना मशीद, आझाद चौक, काळा मारुती रोड, गंगा दरवाजा मार्गे हा मुस्लीम महिलांचा मोर्चा येवला तहसील व प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात सहभागी हजारो महिलांनी मूक मोर्चा काढत तिहेरी तलाक विधेयक रद्द करण्याची मागणी केली.या मागणीचे निवेदन तहसीलदार व प्रांताधिकारी यांना दिले. तिहेरी तलाक रद्द करण्याचा निर्णय केवळ राजकीय स्वार्थासाठी घेण्यात आलेला असून, तातडीने हे विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी या मोर्चात मुस्लीम महिलांनी केली. आम्ही शरीयतला बाध्य आहोत, शरीयतवर आमचा संपूर्ण विश्वास आहे, ट्रिपल तलाक बिल रद्द करा, शरीयतमध्ये कोणाचा हस्तक्षेप नको, सहानुभूतीच्या नावावर आमचा विश्वासघात केल्याने सरकारच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. शरीयतमुळे मुस्लीम महिला पूर्ण सुरक्षित अशा आशयाचे फलक महिलांच्या हातात होते.प्रांताधिकारी भीमराज दराडे व तहसीलदार नरेश बहिरम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहर काजी राफीउद्दीनसह उलेमा धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्रिमंडळाने तिहेरी तलाक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून राज्यसभेत हे विधेयक मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहे. तिहेरी तलाक रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने विरोध दर्शविला आहे. दरम्यान, तिहेरी तलाक विधेयक रद्दकरण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आले असून, या विरोधात हजारो मुस्लीम महिलांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला होता. तीन तलाकचा घेतलेला निर्णय हा शरीयत विरोधात आणि अन्यायकारक असून, त्याचे समर्थन होऊ शकत नाही. भारतीय संविधानाने सर्व धर्मांना आपल्या धर्मांनुसार आचरण करण्याचा अधिकार दिलेला असताना केवळ मतांच्या राजकारणासाठी सरकारने तीन तलाकचे बिल आणले आहे, हे आम्ही कदापि मान्य करणार नाही. त्यामुळे हे बिल रद्द करावे, अशी प्रतिक्रि या महिलांनी व्यक्त केली.
तीन तलाक बिल विरोधातील मागण्या...
शरीयत कायद्यामधील सरकारचा हस्तक्षेप मंजूर नाही.तीन तलाक बिल सरकारने रद्द करावे.शरीयत कायद्यावर संपूर्ण विश्वास.
मोर्चात हजारो महिलांनी उपस्थित राहून सरकार विरोधात निषेध नोंदवला.शैक्षणिक व आर्थिक सुविधांपासून वंचित.