नाशिक : स्वत:च्या शारीरिक अपंगावर दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मात करत अन्य अपंग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नवा आत्मविश्वास भरणाऱ्या डॉ. नसीमा हुरजूक यांची ‘माझी चाकाची खुर्ची’ या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.येथील सिनर्जी फाउंडेशनच्या वतीने येत्या रविवारी (दि.२) संध्याकाळी ६ वाजता गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात प्रा. मुग्धा जोशी या हुरजूक यांच्याशी संवाद साधणार आहेत. ऐन तारुण्यात कमरेखालील शरीर निर्जीव होत असताना असह्य वेदना सहन करत शरीराबरोबर लढाई लढून मनात जिद्द जागविली आणि आपल्यासारख्या शेकडो ते हजारो दिव्यांगांना त्यांच्या पायावर उभे करण्याची खूणगाठ बांधलेल्या कोल्हापूरच्या डॉ. नसीम हुरजूक या सामाजिक कार्यकर्ता आहे. त्यांनी शरीराच्या अपंगावर यशस्वीपणे मात केली खरी मात्र अनेक विशेष व्यक्तींच्या मनामध्येही नवा आत्मविश्वास भरला व त्यांनाही शारीरिक अपंगत्वावर मात करण्याइतके सक्षम बनविले.‘हेल्पर्स आॅफ दी हॅण्डिकॅप्ड’ संस्था हुरजूक यांनी सुरू केली. त्यांनी विशेष व्यक्तींच्या पुनर्वसनाचा वसा घेत त्यांच्यासाठी वसतिगृह, विशेष व्यक्तींना लागणारा कृत्रिम साहित्यांचा आधारही त्यांनी निर्माण करत प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात त्यांनी विशेष व्यक्तींनाच स्थान दिले. विशेष व्यक्तींना समाजाने मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घ्यावे व त्यांच्या मनातील सक्षम ताकद ओळखावी, यासाठी हुरजूक यांचा लढा सुरू आहे. (प्रतिनिधी)
‘माझी चाकाची खुर्ची’
By admin | Published: September 28, 2016 11:28 PM