नाशिक : बनावट नोटा प्रकरणातील प्रमुख संशयित छबू नागरेच्या खुटवडनगरमधील आॅसम ब्यूटि पार्लरमध्ये प्रत्यक्ष नोटा छपाईचे काम करणारा कृष्णा अग्रवाल पोलिसांच्या रडारवर आहे़ संशयित कमिशनवर नोटा बदलून देत असल्याचे तपासात समोर आले असून त्यांच्या जिल्हानिहाय कनेक्शनचा शोध घेतला जात असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली़ या अकरा संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने २ जानेवारीपर्यंत वाढ केलेली आहे़ पुणे आयकर विभाग युनिट एकच्या माहितीनुसार आडगाव पोलिसांनी २२ डिसेंबर २०१६ रोजीच्या मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचून ११ संशयितांकडून १़३५ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या गुन्ह्णात अटक केलेल्या संशयितांमध्ये छबू नागरे, महापालिकेचा माजी घंटागाडी ठेकेदार रामराव पाटील व सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश पांगारकर यांच्यासह सर्व संशयितांना २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या गुन्ह्णाच्या तपासात पोलिसांनी आतापर्यंत बनावट नोटा छापल्या जात असलेल्या आॅसम ब्यूटिपार्लरमधून नोटा छापण्याचे साहित्य जप्त केले़ याबरोबरच या गुन्ह्णातील संशयितांच्या घराची तपासणी, नागरेच्या बँक खात्यातील सुमारे ५८ लाखांची रोकड व इतर संशयितांच्या बँक खात्याची माहिती काढली जाते आहे़ नागरेच्या सांगण्यावरून नोटा छापण्याचे प्रत्यक्ष काम त्याचा साथीदार कृष्णा अग्रवाल करीत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे़ दरम्यान, अग्रवाल हा पोलिसांच्या रडारवर असून, या गुन्ह्णामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, संशयितांची मोड्स आॅपरेंडी काय आहे याचा तपास सुरू आहे़ विशेष म्हणजे संशयित पुणे, ठाणे, मुंबई येथील असल्याने त्यांचे नोटा बदलीसाठी जिल्हानिहाय कनेक्शन असल्याचे समोर आले असून, त्याचाही शोध सुरू आहे़ (प्रतिनिधी)
नागरेचा साथीदार अग्रवाल पोलिसांच्या रडारवर
By admin | Published: December 31, 2016 1:36 AM