नंदिनी नदीच्या पुराचे पाणी ४० घरांमध्ये; कुटुंबांची वाताहत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:57 AM2019-08-06T00:57:03+5:302019-08-06T00:57:46+5:30
नाशिक शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केले होते. मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीला आलेल्या पुराचे पाणी लगतच्या सुमारे ४० घरांमध्ये शिरल्याने सर्व कुटुंबांची वाताहत झाली.
सिडको : नाशिक शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केले होते. मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीला आलेल्या पुराचे पाणी लगतच्या सुमारे ४० घरांमध्ये शिरल्याने सर्व कुटुंबांची वाताहत झाली. अद्यापही घरातून चिखल काढण्याचे काम सुरू आहे. उंटवाडी व आयटीआय पुलावरून बंद करण्यात आलेल्या वाहतुकीमुळे सिडकोचा शहराशी संपर्क तुटला होता. काहीशा थंडावलेल्या पावसाने रात्रीपासून पुन्हा एकदा जोर धरल्याने अद्याप सिडकोतील जनजीवन विस्कळीत झाले असून, काही ठिकाणी आता हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिडको व अंबडसह परिसरात संततधार झालेल्या पावसामुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महापालिकेच्या सिडको बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. जुने सिडको बडदेनगर ते खोडेमळा येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे, तसेच रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांचे हाल होत आहे. याबरोबरच दत्ताचौक, विजयनगर, लेखानगर, तोरणानगर, खांडेमळा संभाजी चौक, खुटवडनगर यांसह सिडको भागातील तसेच अंबड भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, मनपाने त्वरित डागडुजी करण्याची मागणी केली आहे.
रविवारी नंदिनी नदीला आलेल्या पुरामुळे नदी पात्रालगतच्या ४० घरांमध्ये पुराचे पाणी शिरून रहिवाशांचे मोठे नुकसान झाले होते. रहिवासी सकाळी झोपेत असतानाच आलेल्या वेगवान पाण्यामुळे येथील रहिवाशांना जीव वाचविण्यासाठी संसार सोडून बाहेर पळ काढावा लागला.
ग्रामस्थांना स्थलांतराची सूचना
उंटवाडीच्या दोंदे पुलावरून पाणी असल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. नदीचे पाणी खेतवानी लॉन्सपर्यंत आल्याने तीन वर्षांपूर्वीसारखी पुरसदृश स्थिती निर्माण झाली होती. पोलीस व मनपा प्रशासनाने संभाव्य धोका टाळण्यासाठी परिसरातील रहिवाशांना तसेच उंटवाडी ग्रामस्थांना स्थलांतराची सूचना दिली. पाणी ओसरल्याने वाहतूक सुरू झाली आहे.