नांदूरशिंगोटेत अज्ञात चोरट्याने वृध्दाचे ७३ हजार लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 04:54 PM2018-09-27T16:54:17+5:302018-09-27T16:57:34+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बॅँक आॅफ महाराष्टÑाच्या शाखेत वृध्दाला फसवून ७३ हजार लांबविल्याची घटना बुधवारी (दि.२६) रोजी घडली.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बॅँक आॅफ महाराष्टÑाच्या शाखेत वृध्दाला फसवून ७३ हजार लांबविल्याची घटना बुधवारी (दि.२६) रोजी घडली.
माझ्याकडे असलेले दोन लाख रूपये आपल्याकडे ठेवून थोडा वेळ सुट्टे पैसे द्या, असे सांगत हातात कागदी बंडल ठेवत वृध्दाकडून खरे ७३ हजार रूपये लांबविल्याचा प्रकार तालुक्यातील बॅँक आॅफ महाराष्टÑाच्या नांदूरशिंगोटे येथील शाखेत घडला. तालुक्यातील कासारवाडी येथील शिवाजी दशरथ शेळके (६१) असे फसवणूक झालेल्या वृध्दाचे नाव आहे. शिवाजी शेळके यांनी बुधवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास नांदूरशिंगोटे येथील बॅँक आॅफ महाराष्टÑाच्या शाखेतील बचत खात्यातून ७३ हजार रुपये काढले होते. याचवेळी अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला व हातातील कागदी पिशवी देत हे माझे दोन लाख रुपये तुमच्याजवळ ठेवा. मला एका व्यक्तीला ७३ हजार रूपये द्यायचे असून थोेडावेळ तुमच्याकडील सुट्टे पैसे मला द्या, असे सांगितले. मी नांदूरशिंगोटे येथीलच असल्याचे त्याने सांगितल्याने शेळके यांनी देखील विश्वास ठेवत त्यांच्याकडील दोन लाख रुपये असलेली पिशवी ठेवून घेत आपल्याकडील ७३ हजार रुपये त्या अज्ञात व्यक्तीच्या हवाली केले. मात्र, बराच वेळानंतरही पैसे घेवून गेलेला व्यक्ती परत न आल्याने शेळके यांनी पिशवीतील पैसे उघडून पाहिले असता त्यात केवळ सफेद कागदांचा बंडल दिसून आला. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे शेळके यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नांदूरशिंगोटे येथील पोलीस दुरक्षेत्रात अज्ञात चोरट्या विषयी माहिती देवून आपली फसवणूक झाल्याचे सांगितले. याप्रकरणी वावी पोलिसांत अज्ञातविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.