घरपट्टीत पन्नास टक्के सवलत देण्याची नरेडकोची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 04:05 PM2020-06-10T16:05:28+5:302020-06-10T16:06:16+5:30
कोरोनामुळे निर्माण झालेली आर्थिक स्थिती बघता घरपट्टीत पन्नास टक्के सूट द्यावी तसेच रिक्त भूखंडावरील करदेखील माफ करण्याची मागणी नरेडकोने केली आहे. संस्थेचे पदाधिकारी सुनील गवादे यांनी यासंदर्भात आयुक्तांकडे मागणी केली आहे.
नाशिक : कोरोनामुळे निर्माण झालेली आर्थिक स्थिती बघता घरपट्टीत पन्नास टक्के सूट द्यावी तसेच रिक्त भूखंडावरील करदेखील माफ करण्याची मागणी नरेडकोने केली आहे. संस्थेचे पदाधिकारी सुनील गवादे यांनी यासंदर्भात आयुक्तांकडे मागणी केली आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेले अडीच ते तीन महिने लॉकडाऊनमुळे सर्व बाजारपेठा ठप्प होत्या. त्यामुळे आर्थिक व्यवहारदेखील ठप्प होते. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरदेखील झाला आहे. नाशिक शहरासह सर्वत्रच ठिकाणी काही वर्षे हा परिणाम राहाणार आहे. अशा स्थितीत शासनस्तरावर आर्थिक चालना देण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. शहरात गेल्या महिनाभरात बांधकामांना परवानग्या मिळाल्या असून, आत्ताशी कुठेतरी बांधकामे सुरू आहेत. तथापि, या क्षेत्रासमोरदेखील अनेक अडचणी आहेत.
सध्याची स्थिती बघता वार्षिक मालमत्ता कर (घरपट्टी) आकारणी दरात पन्नास टक्के सवलत द्यावी तसेच शहरातील रिक्त भूखंडावर मोठ्या प्रमाणात कर लागू असून, तीदेखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पालक संस्था असलेल्या नाशिक महापालिकेने यासंदर्भात नागरिकांना दिलासा देण्याची मागणी सुनील गवादे यांनी आयुक्तांकडे केली आहे.