- अझहर शेख
नाशिक - ‘बंद करो, बंद करो नशे का धंदा बंद करो...’, ‘मैं उम्मती हुं इसलिये नशे के खिलाफ खडा हुं’, ‘ड्रग्ज फ्री नाशिक’, नशे का हम करे मिलकर नाश’, असे विविध घोषवाक्यांचे फलक हाती घेत शहरातील उर्दू शाळा, महाविद्यालयांसह मदरशांचे विद्यार्थी आपापल्या पोशाखात नशामुक्तीसाठी रविवारी (दि.१) सकाळी काढण्यात आलेल्या ‘जुलूस’मध्ये सहभागी झाले. शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समुदायाकडून सर्व धर्मगुरुंच्या मार्गदर्शनाने अमली पदार्थांची खरेदी, विक्रीविरोधात नारा ‘बुलंद’ करण्यात आला.
इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव अर्थात ईद-ए-मिलाद येत्या रविवारी (दि.९) सर्वत्र साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभुमीवर शहर व परिसरात विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांना शहरातील बहुतांश सामाजिक संघटनांनी एकत्र येत सुरुवात केली आहे. सर्व धर्मगुरू, उलेमांनी मार्गदर्शनाखाली जुने नाशिकमधील चौक मंडई येथून रविवारी सकाळी ‘नशामुक्तीकरिता जुलूस’ काढण्यात आला. नशाखोरीपासून स्वत:ला व समाजाला कोसो दूर ठेवा व सुरक्षित सुदृढ जीवन जगा, अशी शिकवण पैगंबरांनी दिली आहे. या शिकवणीचा समाजाने विसर पडू देऊ नये, असे आवाहन या जनजागृती फेरीदरम्यान सहभागी धर्मगुरूंनी केले. प्रारंभी खतीब यांनी शहरासह राज्य व देश नशामुक्त व्हावा, सर्वांनी गुण्यागोविंदाने निरामय आरोग्य जगावे आणि देशाच्या प्रगतीमध्ये महत्वाचे योगदान द्यावे, याकरिता ‘दुवा’ मागितली. यानंतर फेरीला प्रारंभ करण्यात आला.
चौकमंडई, बागवानपुरा, कथडा, शिवाजी चौक, मिरादातार दर्गामार्गे, आझाद चौकातून चव्हाटा, पठाणपुरा, काजीपुरा, कोकणीपुरा, खडकाळी, शहीद अब्दुल हमीद चौकातून मार्गस्थ होत पिंजारघाटरोडवरून बडी दर्गाच्या प्रारंगणात या नशामुक्ती जुलूसची सांगता करण्यात आली. यावेळी येथे उभारण्यास आल्या मंचावरून हिसामुद्दीन खतीब यांच्यासह विविध धर्मगुरूंनी आपले विचार व्यक्त करत नशेच्या आहारी जाण्याचे नुकसान याविषयी प्रबोधन केले. यावेळी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्ता जाधव यांच्यासह पोलिसांचा या फेरीला बंदोबस्त होता. समुदायाच्या वतीने जाधव यांना मंचावर निवेदन देण्यात आले. या निवेदनातून पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणारे अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्याची मागणी करण्यात आली.