नाशिकमध्ये रंगोत्सव उत्साहात; पोलिसांचा विरोध झुगारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 05:26 PM2020-03-13T17:26:53+5:302020-03-13T17:27:28+5:30
नाशिक मध्ये रंगपंचमीला रंग खेळण्याची परंपरा आहे. त्यासाठी पेशवेकालीन राहाडी ( हौद) उघडून त्या स्वच्छ केल्या जातात आणि रंगीत पाण्याचा हौद तयार केल्यानंतर त्यात रंग खेळण्याची मूळ नाशिककरांची परंपरा आहे.
नाशिक- रंगांची मुक्त उधळण करीत कुठे रेन डान्स तर कुठे शॉवर डान्स कुठे कोरडा रंग तर कुठे चेहेऱ्यावर रंगाची नक्षी रेखाटत नाशिककरांनी अत्यंत उत्साहात रंगपंचमी साजरी केली. विशेष म्हणजे कोरोना मुळे पोलिसांनी राहाडीवर रंगोत्सव खेळण्यास विरोध केल्यानंतरही हा विरोध झुगारून राहाडीत धप्पा म्हणजे उड्या घेण्यात आल्या.
नाशिक मध्ये रंगपंचमीला रंग खेळण्याची परंपरा आहे. त्यासाठी पेशवेकालीन राहाडी ( हौद) उघडून त्या स्वच्छ केल्या जातात आणि रंगीत पाण्याचा हौद तयार केल्यानंतर त्यात रंग खेळण्याची मूळ नाशिककरांची परंपरा आहे. राहाडीचे विधिवत पूजन करून नैसर्गिक रंगाचा प्रामुख्याने वापर केला जातो मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी करू नये यासाठी पोलीस प्रशासनाने राहाडीत रंग खेळण्यास विरोध केला होता. आज सकाळीही पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या सह अन्य अनेक अधिकाऱ्यांनी राहाडीशी संबंधित कार्यकर्त्यांना ताकीद दिली होती परंतु त्यानंतरही राहाडीत रंग खेळण्यासाठी गर्दी झाली होती. मोजक्याच ठिकाणी गर्दी कमी होती.
दरम्यान काही नगरसेवकांनी आणि राजकीय नेत्यांनी रंगाचे शॉवर आणि रेन डान्सची सोय केल्याने तरूणाईने त्याचा आनंद लुटला. शहराच्या अन्य भागात उपनगरात देखील अबाल वृद्धांनी कुटुंबीय आणि मित्र परिवार यांच्या सोबत रंग खेळले. सायंकाळी गोदा घाट, सोमेश्वर धबधबा येथे देखील गर्दी झाली होती.