नाशिक  शहरात नऊ महिन्यांत सव्वा कोटींची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:06 AM2018-10-23T01:06:22+5:302018-10-23T01:07:00+5:30

शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत चेनस्नॅचिंग, जबरी चोरी, दरोडा व लूट करणाऱ्या गुन्हेगारांनी नाशिककरांची सुमारे सव्वा कोटी रुपयांची लूट केली आहे़

Nashik city robbed about one and a half crore in nine months | नाशिक  शहरात नऊ महिन्यांत सव्वा कोटींची लूट

नाशिक  शहरात नऊ महिन्यांत सव्वा कोटींची लूट

Next

नाशिक : शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत चेनस्नॅचिंग, जबरी चोरी, दरोडा व लूट करणाऱ्या गुन्हेगारांनी नाशिककरांची सुमारे सव्वा कोटी रुपयांची लूट केली आहे़ यामध्ये दीड किलो दागिन्यांचा समावेश असून, या चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी शहर पोलिसांनी ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल परत मिळवला आहे़ दरम्यान, गत नऊ महिन्यांमध्ये चेनस्नॅचिंग, जबरी चोरी, दरोडा व लुटमारीचे १५९ गुन्हे दाखल असून, त्यापैकी ८४ गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे़ आतापर्यंत पोलिसांनी दोन वेळा नागरिकांना मुद्देमाल परत केला असून, लवकरच गुन्हेगारांकडून जप्त केलेला सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल परत केला जाणार आहे़  शहरात दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची पोत खेचून नेणे, शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करीत मोबाइल, रोख रक्कम, वाहने घेऊन गुन्हेगार फरार झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. याप्रकरणी शहरातील तेरा पोलीस ठाण्यांमध्ये १५९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या विविध घटनांमध्ये गुन्हेगारांनी एक कोटी २५ लाख आठ हजार ४७८ रुपयांची लूट केली आहे. पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांचा लुटीचा आकडा असला तरी बाजारभावानुसार या लुटीतील वस्तूंची किंमत कितीतरी अधिक आहे़  पोलिसांनी सप्टेंबरअखेरपर्यंत १५९ पैकी ८४ गुन्हे उघडकीस आणले असून १६२ गुन्हेगारांना गजाआड केले आहे़ पोलिसांनी पकडलेल्या या संशयितांकडून ४२ लाख २४ हजार ४७८ रुपयांचा मुद्देमाल परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे़
चोरट्यांकडून दीड किलो सोन्याची लूट
शहर पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्यांमध्ये चेनस्नॅचिंगचे ५५ गुन्हे दाखल असून, त्यात ८८ संशयितांचा सहभाग आहे. दाखल गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून या संशयितांनी महिलांकडील १५८.३५ तोळे म्हणजेच सुमारे दीड किलो सोन्याचे दागिने चोरट्यांनी खेचून नेले आहे़ पोलिसांनी सहा गुन्हे उघडकीस आणले असून, ६६ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत़
चोरीचा माल खरेदी करणाºयांवर गुन्हे
गुन्हेगारांना अटक केल्यानंतर पोलिसांकडून मुद्देमाल जप्त करण्यासाठी प्रयत्न केले जातात़ मात्र, चोरट्यांचे खरेदीदार हे ठरलेले असल्याचे पोलीस तपासात समोर आलेले आहे़ त्यामुळे चोरीचा माल असल्याचे आम्हाला माहीत नव्हते, असा बचाव खरेदी करणाºयांना करता येणार नाही़ तसेच चोरीचा माल खरेदी करणाºयांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत़

Web Title: Nashik city robbed about one and a half crore in nine months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.