Sonai Honour Killing Case : सोनई तिहेरी हत्याकांडातील 6 दोषींना फाशीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 11:27 AM2018-01-20T11:27:22+5:302018-01-20T14:39:27+5:30
सोनई तिहेरी हत्याकांडातील 6 दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नाशिक - संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारे अहमदननगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांडातील दोषी सहाही आरोपींना शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. आर. वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. ‘तुमचे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे तर आहेच, परंतु तुम्ही ज्या निर्दयतेने हे हत्याकांड घडविले ते पाहता तुम्ही सैतानही आहात, तुम्ही जिवंत राहणे हे समाजासाठी धोकादायक आहे’ अशा शब्दात न्यायालयाने निकालपत्रात ताशेरे ओढत अवघ्या दहा मिनिटांत न्यायालयाचे कामकाज स्थगित केले.
या हत्याकांडात न्यायालयाने रमेश विश्वनाथ दरंदले (३९), प्रकाश विश्वनाथ दरंदले (३४), पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले (४८), गणेश उर्फ प्रवीण पोपट दरंदले (१९) सर्व रा. गणेशवाडी (विठ्ठलवाडी) सोनई, तालुका नेवासा; अशोक सुधाकर नवगिरे (२८) व संदीप माधव कुºहे (३३) रा. खरवंडी, ता. नेवासा यांना सोमवारी दोषी ठरविले होते. तर अशोक रोहीदास फलके रा. लांडेवाडी,सोनई यास दोषमुक्त केले होते. त्यामुळे शनिवारी न्यायालय काय निकाल देते याकडे सा-यांचे लक्ष लागून होते.
सवर्ण जातीच्या मुलीशी प्रेमप्रकरण असल्याच्या संशयावरून आरोपींनी सचिन सोहनलाल घारू (२६), संदीप राजू थनवार (२४) व राहूल राजू कंडारे( २६) सर्व रा. त्रिमुर्ती कॉलेज, नेवासा फाटा या तीन तरूणांचा अतिशय निर्दयपणे १ जानेवारी २०१३ रोजी खून केला होता. समाजजीवन ढवळून काढणा-या या हत्याकांडाचे राज्यात तीव्र पडसाद उमटून त्यावेळी सरकारही टीकेचे धनी झाले होते. त्यामुळे या हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने घटनेचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण (सीआयडी)कडे सोपविण्याबरोबरच खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आली होती. अतिशय गाजलेल्या, जातीयवादाची परिसिमा गाठलेल्या व संवेदनशील असलेल्या या खटल्याचे अहमदनगर जिल्ह्यात पडसाद उमटण्याची शक्यता पाहून नाशिकच्या न्यायालयात हा खटला सुनावणीसाठी वर्ग करण्यात आला होता.
या खटल्याची अंतीम सुनावणी सोमवारी (15 जानेवारी) येथील जिल्हा व सत्र न्यायालयात करण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजुंचे म्हणणे जाणून गुरूवार (18जानेवारी) रोजी निकाल देण्याचे जाहीर केले होते. गुरूवारी सकाळी खटल्याचे कामकाज सुरू झाल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकीलांना पुन्हा एकदा बाजू मांडण्याची संधी दिली त्यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अर्धातास युक्तीवाद करून देशात व राज्यात जातीयवादाच्या घटना घडत असून, सदरची घटना त्याचेच द्योतक आहे. जातीयवादाचा मोठा धोका निर्माण होत असेल तर कायद्याच्या आधारेच त्यांना तुडवले गेल्यास पुन्हा तसे कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही, त्यामुळे सर्व आरोपींना जास्तीत जास्त मृत्युदंडाची शिक्षा द्यावी, अशी विनंती करून सदरचे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे म्हटले होते. न्यायालयाने युक्तीवाद ऐकल्यानंतर शनिवारी निकाल देण्याचे जाहीर केले होते.
अशी केली तिघांची हत्या
आरोपींनी अतिशय निर्दयपणे तिघांचे खून केले. क्रौर्यालाही लाजवेल अशा पद्धतीने थंड डोक्याने परंतु अतिशय नियोजनबद्धपणे हे हत्याकांड करण्यात आले. प्रारंभी संदीप राजू थनवार याला पकडण्यात आले. संदीप हा शरीरयष्टीने धडधाकड असल्याने त्याला संपविणे इतके सोपे नसल्याचे पाहून सर्व आरोपींनी एकत्र येत संदीपला ज्या सेफ्टी टँकमध्ये तो काम करीत होता त्याच टँकच्या पाण्यामध्ये त्याचे डोके खाली व पाय वर करून पाण्यात बुडवून ठार मारले.
हा प्रकार पाहून राहूल उर्फ तिलक राजू कंडारे हा जीवाच्या भीतीने शेतातून जिकडे वाट मिळेल तिकडे पळत असताना त्याचा पाठलाग करण्यात आला व ऊस तोडीच्या कोयत्याने डोक्याच्या मागील बाजूस वार करून जखमी केले. वर्मी घाव बसलेल्या राहूल कंडारे याने अवघ्या काही क्षणातच प्राण सोडला. संदीप व राहुल यांच्यापेक्षा आरोपींच्या मनात सचिन धारू याच्या विषयी अधिक राग होता त्यामुळे सचिनने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, त्याचाही पाठलाग करून पकडण्यात आले. ज्या ठिकाणी सचिनला पकडले त्या ठिकाणाजवळील शेत गट नंबर २९८/२ मधील शेतातील खड्डयात नेवून वैरण कापण्याचे आडकित्यामध्ये सचिनला जिवंत टाकून प्रथम त्याचे दोन्ही पाय गुडघ्यापासून व दोन्ही हात खांद्यापासून कापून वेगळे केले. नंतर जिवंतपणे त्याची मान आडकित्त्यामध्ये घालून ती धडापासून वेगळी करून क्रुरपणे त्यास ठार मारले.
पुरावे नष्ट करण्यासाठी विविध क्लृप्त्या
आरोपींनी या हत्याकांडाचा सुगावा लागू नये म्हणून व कोणताही पुरावा आपल्या विरूद्ध सापडू नये याची पुरेपुर काळजी घेतांना घटनेतील अनेक पुरावे नष्ट केली. त्यात त्यांनी सचिन धारू याचे कापलेले दोन्ही हात व पायाचे तुकडे करून शेतातील उघड्या बोअरवेलमध्ये टाकून पुरावा नष्ट केला. तसेच त्याचे धड व मुंडके आणि राहुल कंडारे याचे प्रेत तेथून जवळच असलेल्या बाळू रामदास दरंदले याच्या मालकीच्या परंतु आरोपी पोपट ऊर्फ रघुनाथ दरंदले हे वाट्याने करीत असलेल्या शेत गट नंबर २९३ मधील शेतातील कोरड्या ४० फुट खोलीच्या विहिरीमध्ये नेवून खड्डा करून पुरले. तिहेरी हत्याकांड घडवून आणतांना सर्व आरोपींच्या अंगावर मयतांचे रक्त उडले होते. त्याचा पुरावा मिळू नये म्हणून सर्वच आरोपींनी स्वत:च्या अंगावरील रक्ताने भरलेले कपडे शेतातच जाळून टाकून पुरावा नष्ट केला. संदीप थनवार याचा मृतदेह मात्र त्यांनी तसाच सेफ्टी टॅँकमध्ये ठेवला व त्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची खबर सोनई पोलिसांना दिली.
९८२ पानांचे दोषारोपपत्र
राज्यात खळबळ उडवून देणा-या सोनई हत्याकांडाचा प्राथमिक तपास सोनई पोलिसांमार्फत करण्यात आला. त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास हाती घेतला. परंतु गुन्ह्याची व्याप्ती व गंभीरता पाहता आरोपींना कडक शासन व्हावे यासाठी तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी १५ फेब्रुवारी २०१३ रोजी राज्य गुन्हा अन्वेषण (सीआयडी) विभागाकडे चौकशी सुपूर्द केली. साधारणत: एका महिन्यात तपास पूर्ण होऊन २५ मार्च २०१३ रोजी सीआयडीने आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यात ९८२ पानांचे दोषारोपपत्र असून, ५३ साक्षिदारांचे जबाब नोंदवून त्यांची न्यायालयासमोर तपासणी झाली
सोनई हत्याकांडातील सहा दोषींची नावं
प्रकाश विश्वनाथ दरंदले
रमेश विश्वनाथ दरंदले
पोपट विश्वनाथ दरंदले
गणेश पोपट दरंदले
अशोक नवगिरे
संदीप कुऱ्हे
सातवा आरोपी अशोक रोहिदास फलकेला पुराव्यांअभावी निर्दोष ठरवण्यात आलं
नेमकी काय आहे घटना?
नेवासा फाटा येथील घाडगे-पाटील महाविद्यालयाच्या त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात असलेल्या बी.एड महाविद्यालयातील एका मुलीचे सफाई कामगार म्हणून तात्पुरत्या स्वरूपात कामास असलेल्या मेहतर समाजातील सचिन घारू या मुलावर प्रेम होते. या प्रेम प्रकरणातून १ जानेवारी २०१३ रोजी सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे सचिन घारू (२३), संदीप राज धनवार (२४) व राहुल कंडारे (२६) या तिघा तरुणांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. हे तिघेही नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये कामास होते. त्यांना स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे, असे सांगून विठ्ठलवाडी येथे बोलावून घेण्यात आले. त्यानंतर धनवार व कंडारे यांचा खून करून त्यांचे मृतदेह पोपट दरंदले यांच्या कोरड्या विहिरीत पुरण्यात आले, तर घारू याचे मुंडके व हातपाय जनावरांचा चारा तोडण्याच्या अडकित्त्याने तोडून कूपनलिकेत टाकून देण्यात आले होते. १ जानेवारी २०१३ रोजी अहमदनगर जिल्ह्णाच्या सोनईमध्ये ही ऑनर किलिंगची घटना घडली होती. आंतरजातीय प्रेम प्रकरणातून मुलीचे वडील, काका यांनी सचिन घारूसह त्याच्या दोन मित्रांना बोलावून घेत त्यांची निर्घृण हत्या केली.
या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात सातही आरोपींविरोधात खून, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, भारतीय हत्यार कायदा तसेच मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नेवासा सत्र न्यायालयात खटला सुरू असताना साक्षी पुराव्याच्या वेळी साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो या शक्यतेमुळे तो नाशिक किंवा जळगाव न्यायालयात चालवावा, अशी विनंती याचिका मृताचे नातलग पंकज राजू तनवार यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. सुनावणीअंती खंडपीठाने याचिकाकर्त्यांचे मुद्दे, म्हणणे ग्राह्ण धरून त्यांची विनंती मान्य केली व हा खटला नेवासा सत्र न्यायालयातून वर्ग करून नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्याचे आदेश दिले होते.
परिस्थितीजन्य पुराव्यातील महत्त्वाचे मुद्दे
युक्तिवादावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा का द्यावी याविषयी खटल्यातील परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे 13 मुद्दे न्यायालयासमोर स्पष्ट केले होते. त्यात-
१) मयत सचिन धारू हा अनुसूचित जातीचा होता व तो त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात कामाला होता व त्याच महाविद्यालयातील सवर्ण जातीच्या विद्यार्थिनीशी त्याचे प्रेम होते व दोघांनीही लग्न करण्याचा निश्चय केला होता.
२) सदरची घटना १ जानेवारी २०१३ रोजी दुपारी साडेतीन ते रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली होती. सचिन धारू जेथे काम करीत होता व राहत होता तेथून २५ किलोमीटर अंतरावर दरंदल वस्तीत हे घटनास्थळ आहे.
३)घटनेच्या अगोदर पंधरा ते वीस दिवसांपूर्वी सचिनला आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली होती.
४) मयत सचिन धारू हा सवर्ण जातीच्या मुलीशी विवाह करणार आहे याची पुरेपूर खात्री आरोपींना होती हे हेरूनच त्यांनी कट केला व अशोक नवगिरे याला त्यासाठी पुढे करून सचिनचा मित्र संदीप धनवार याला खोटे कारण दाखवून बोलवून घ्यायचे, संदीपबरोबर सचिन धारू हादेखील येईल हे सर्व आरोपींना ज्ञात होते.
५) अशोक नवघरेच्या निमंत्रणावरून संदीप व सचिन हे दुचाकीने सकाळी १० वाजता त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातून दरंदले वस्तीकडे गेले होते.
६) १ जानेवारी २०१३ रोजी सकाळी दहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत संदीप व सचिन हे दरंदले वस्तीवर काम करीत होते.
७) रात्री १ वाजता आरोपी पोपट दरंदले व अशोक नवघरे यांनी सोनई पोलीस स्टेशनला तोंडी तक्रार दिली त्यात म्हटले की, संडासाच्या सफाईचे काम सुरू असताना सफाई कामगाराचे प्रेत सापडले आहे, अशी खोटी माहिती देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
८) सर्व आरोपींनी योग्य नियोजन करून थंड डोक्याने क्रूरपणे तिहेरी हत्याकांड केले आहे.
९) या खटल्यात सवर्ण जातीची मुलगी फितूर झाली असली तरी, ही घटना १ जानेवारी २०१३ रोजी घडली तोपर्यंत मुलगी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात कॉलेजमध्ये शिकत होती. परंतु घटनेनंतर तिने कॉलेजला जाणे बंद केले. याबाबत तिला तिच्या शिक्षकांनी विचारले असता, ‘तिने आमच्या घरी प्रॉब्लेम झाला आहे’ असे सांगितले.
१०) सर्व आरोपींचा सचिनवर इतका राग व द्वेष होता की त्यांनी जात व्यवस्थेला महत्त्व दिले ही शोकांतिका आहे.
११) हत्याकांड करताना आरोपींचा राग इतका टोकाला होता की त्यांनी सचिनच्या हात व पायाचे ८ तुकडे केले व ते पाणी असलेल्या खोल विहिरीत टाकले तसेच त्याचे शीर कापून धड कोरड्या विहिरीत बुजून टाकले. सचिनचा मित्र राहुल याचाही निर्घृणपणे खून करताना त्याच्या डोक्यावर घाव घातले.
१२) आरोपींनी अतिशय नियोजनपर्ण कट केला. सचिन व राहुल यांचा कोणताही पुरावा ठेवला नाही.
१३) सचिनचा मित्र संदीप याला संडासात उलटे टांगून त्याला गुदमरून ठार मारले.