बारावीच्या कॉपी प्रकरणात नाशिकची जळगावसोबत बरोबरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 04:39 PM2020-03-21T16:39:57+5:302020-03-21T16:49:58+5:30
नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने कॉपीच्या प्रकरणांमध्ये घेतलेली आघाडी कायम राखली असून, नाशिकमध्येही जळगावच्या बरोबरीने ३८ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत. तर धुळे जिल्ह्याने कॉपीमुक्ती अभियानाच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू केली असून, यावर्षी धुळे जिल्ह्यात केवळ एक कॉपीचे प्रकरण आढळून आले आहे, तर नंदुरबारमध्ये २३ कॉपीची प्रकरणे समोर आल्याची माहिती नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.
नाशिक : बारावीची परीक्षेचे सर्व पेपर झाले असून परीक्षेच्या पूर्वार्धातच नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने कॉपीच्या प्रकरणांमध्ये घेतलेली आघाडी कायम राखली असून, नाशिकमध्येही जळगावच्या बरोबरीने ३८ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत. तर धुळे जिल्ह्याने कॉपीमुक्ती अभियानाच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू केली असून, यावर्षी धुळे जिल्ह्यात केवळ एक कॉपीचे प्रकरण आढळून आले आहे, तर नंदुरबारमध्ये २३ कॉपीची प्रकरणे समोर आल्याची माहिती नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव नितीन उपासणी दिली आहे.
नाशिक विभागात बारावीच्या परीक्षेला यंदा १ लाख ६६ हजार ४६८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यात नाशिक जिल्ह्यातील ७५ हजार ३४३, धुळे जिल्ह्यातून २५ हजार २६४, जळगावमधून ४९ हजार ४०३, नंदुरबार जिल्ह्यातील १६ हजार ४६८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात जळगावमध्ये बारावीच्या पहिल्या पेपरपासूनच गंभीर स्वरूपाची कॉपी प्रकरणे समोर आली असून, त्यानंतर सलग जळगावमध्ये कॉपीची प्रकरणे उघड होत असल्याने परीक्षेच्या पूर्वार्धात झालेल्या वेगवेगळ्या पेपरमध्ये जळगावमधून सर्वाधिक कॉपीची प्रकरणे समोर आली होती. त्यातुलनेत काहीसा पिछाडीवर असलेल्या नाशिक जिल्ह्यातही उर्वरित पेपरमध्ये कॉपी प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने सुरुवातीला दुसºयास्थानी असलेल्या नाशिकने कॉपी प्रकरणांमध्ये जळगवाची बरोबरी साधली असून, परीक्षा संपल्यानंतर नाशिक व जळगावमध्ये प्रत्येकी ३८ कॉपी प्रक रणे समोर आली आहे. तर नंदुरबार २३ कॉपीची प्रकरणे समोर आल्याने दुसºया स्थारनावर आहे. धुळे जिल्ह्यात परीक्षेच्या पूर्वार्धात एकही कॉपीचे प्रकरण समोर आले नव्हते. परंतु उत्तरार्धात धुळ्यात एक कॉपीचे प्रकरण समोर आल्याने विभागात कॉपी प्रकरणांनी शंभरी गाठली आहे. या परीक्षेत कॉपीमुक्त होण्यापासून धुळे जिल्हा केवळ एक पाऊल दूर राहिला. मात्र कॉपीमुक्तीच्या दिशेने जिल्ह्याची यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे जिल्हा शिक्षण विभागाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. गेल्यावर्षी सर्वाधिक कॉपी प्रकरणांमुळे जळगाव जिल्ह्याचे नाव चर्चेत राहिलेले असताना यावर्षीही जळगावातील भडगाव येथील परीक्षा कें द्रावर परीक्षेच्या पहिल्याच दिवशी उत्तरपत्रिका तयार करून छायांकित प्रति तयार करण्यासारखा गंभीर प्रकार समोर आला होता. त्यामुळे नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था चर्चेचा विषय बनली आहे.