नाशकात होणार राज्यातील पहिले ‘गिधाड प्रजनन केंद्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 12:31 AM2020-12-02T00:31:39+5:302020-12-02T00:32:08+5:30
भारतात गिधाडांची संख्या वाढविण्यासाठी केंद्र सरकारने पंचवार्षिक धोरणात्मक कृती आराखडा घोषित केला आहे. यामध्ये गिधाडांच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून देशभरातील पाच राज्यांत नव्याने ‘गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र’ स्थापन केले जाणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात नाशिकची यासाठी निवड करण्यात आली आहे.
अझहर शेख,
नाशिक : भारतात गिधाडांची संख्या वाढविण्यासाठी केंद्र सरकारने पंचवार्षिक धोरणात्मक कृती आराखडा घोषित केला आहे. यामध्ये गिधाडांच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून देशभरातील पाच राज्यांत नव्याने ‘गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र’ स्थापन केले जाणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात नाशिकची यासाठी निवड करण्यात आली आहे.
भारतीय वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण सूची-१मध्ये गिधाड या मृतभक्षी पक्ष्याचा समावेश करण्यात आला आहे. निसर्गाचा सफाई कामगार अशी ओळख असलेला गिधाड नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भारतातसुद्धा गिधाडांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागल्याने अन्नसाखळीमधील हा महत्त्वाचा दुवा जगविण्याकरिता आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या गिधाड संवर्धन कृती आराखड्यात मुख्य समन्वयक म्हणून केंद्रीय अपर वन अधीक्षक सौमित्रदास गुप्ता यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक डॉ. विभू प्रकाश या आराखड्याच्या टास्क फोर्स समितीत आहेत. या कृती आराखड्याचे समन्वयक केंद्रीय अपर वन अधीक्षक सौमित्रदास गुप्ता आहे. गिधाड प्रजनन केंद्र विकसित करण्याकरिता सुमारे ४० कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामध्ये नाशिकचाही समावेश असून, सुमारे सात ते आठ कोटी रुपयांचा निधी नाशिकच्या वाट्याला येणार आहे. राज्यात आतापर्यंत गिधाड पैदास केंद्र कोणत्याही शहरात अस्तित्वात आलेले नाही.
भारतात या ठिकाणी होणार नवे केंद्र
नाशिक (महाराष्ट्र), गोरखपूर (उत्तर प्रदेश), कोइम्बतूर (तामिळनाडू), रामनगर (कर्नाटक), त्रिपुरा या पाच राज्यांत नव्याने गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र तयार करण्यात येणार आहे. या केंद्रांमुळे गिधाडांची पैदास सुरक्षित होण्यास मदत होऊन त्यांची संख्या वाढीस मोठा हातभार लागेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.
‘अंजनेरी’ गिधाडांचे हक्काचे घर
नाशिक शहरापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजनेरी राखीव वनातील डोंगराच्या कपारींमध्ये गिधाडांचा मोठ्या संख्येने अधिवास आढळतो. अंजनेरी डोंगरावर गिधाडे घरटी करुन राहतात, यामुळे हे त्यांचे हक्काचे नैसर्गिक घर आहे. येथून जवळच असलेल्या ब्रह्मगिरी, मेटघर किल्ला या भागातसुद्धा गिधाडांचा अधिवास आढळतो. भारतात गिधाडांच्या सहा प्रजाती आढळतात. नाशिकमध्ये पांढऱ्या पाठीचे आणि लांब चोचीच्या गिधाडांची संख्या अधिक असल्याचे निरीक्षण नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिकच्या पक्षी अभ्यासकांनी नोंदविले आहे.
... अन् नाशिककरांची जबाबदारी वाढली
रामसर दर्जाचे राज्यातील पहिल्या पाणस्थळाचा गौरव नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याला मिळाला. यानंतर राज्यात पहिले गिधाड पैदास केंद्रदेखील नाशकात होणार असल्याची घोषणा थेट केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. यामुळे नाशिकच्या जैवविविधता समृद्धतेच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे. पर्यावरण व निसर्ग संवर्धनाबाबतची नाशिककरांची जबाबदारी अधिक वाढली आहे.