नाशिकच्या उद्योगांना नागपुरात आवतण, सवलतीचे पॅकेज, खुद्द मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 04:45 AM2017-12-11T04:45:10+5:302017-12-11T04:45:33+5:30
नाशिक येथील उद्योग विदर्भात स्थलांतरित करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला असून काही उद्योजकांशी चर्चा करून त्यांना नागपूरचे आवतण देण्यात आले आहे.
संजय पाठक / लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : येथील उद्योग विदर्भात स्थलांतरित करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला असून काही उद्योजकांशी चर्चा करून त्यांना नागपूरचे आवतण देण्यात आले आहे. विदर्भातील सवलतीमुळे अनेक उद्योजकही सकारात्मक झाले असून, एका उद्योगाने नागपुरात विस्तारीकरणही केले आहे.
उत्तर महाराष्ट्राचे मुख्य केंद्र असलेल्या नाशिकमध्ये मुबलक पाणी आणि दळणवळणाच्या सुविधेमुळे उद्योगास पोषक वातावरण आहे. सुवर्ण त्रिकोणातील शहरामुळे मुंबई आणि पुण्यानंतर नाशिकचे नाव घेतले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत येथे नवीन उद्योग आलेला नाही. सिन्नरचा सेझ रखडला आहे. दिंडोरी क्षेत्राची जागा उद्योजकांना अजूनही योग्य वाटत नाही. यापूर्वीची जकात आणि एलबीटी तसेच एमआयडीसीतील अडचणींमुळे आधीच अनेक उद्योगांनी गुजरात, चेन्नई, उत्तराखंडकडे नवे प्रकल्प सुरू केले आहे. विदर्भात नागपुरला विजेचे दर कमी, त्यात सरकारकडून हमी त्यामुळे येथील उद्योग तेथे जाण्यासाठी तयार होतात. नाशिकमधील मोठ्या उद्योगांना मुख्यमंत्र्यांनीच साद घातल्याचे समजते. एका उद्योगाने नाशिकमध्ये दोन प्रकल्प असताना तिसरा प्रकल्प विदर्भात सुरू केला आहे.
विदर्भात सवलतीचे पॅकेज दिले जात असल्याने उद्योजक त्याकडे आकर्षित होत आहेत. नाशिकमधील तीन उद्योजकांना मुख्यंमत्र्यांनी विदर्भात उद्योग सुरू करण्यासाठी निमंत्रित केले आहे. याशिवाय एका मोठ्या कंपनीने नाशिकमधील विस्तारीकरण थांबवून ते नागपूरला केले आहे.
- डॉ. डी. एल. कराड,
राज्य अध्यक्ष, सीटू
विदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना वीज दरात सवलत आहे. रोलिंग मिल्ससारख्या उद्योजकांना एक तर दर मार्जिनचे दर कमी करावे लागतील किंवा वीज दरात सवलत मिळेल, अशा ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागेल.
- मधुकर ब्राह्मणकर,
अध्यक्ष, निमा