नाशिक - लोकसभेच्या नाशिकच्या जागेवरून राजकीय खल अजूनही सुरूच आहे. शिंदेसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्याला उमेदवारीचे आश्वासन दिल्याचे सांगत शालिमार चौकात श्री हनुमानाची आरती केली, तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या उमेदवारीबाबत काही महिन्यांपूर्वी दिल्लीत महायुतीची बैठक झाली आणि त्यावेळेपासूनच आपल्याला लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचा प्रस्ताव देण्यात आला, असा दावा केला आहे. त्यामुळे नाशिकच्या उमेदवारीबाबतचा संभ्रम आणखी वाढला असून, सोमवारी याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या जागेसाठी महायुतीतील भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गट हे तिघेही दावेदार आहेत. भाजपला ही जागा हवी असली तरी उमेदवार म्हणून कोण असेल, हे स्पष्ट नाही, तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांचे नाव पुढे आले आहे. साहजिकच शिंदेसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबईत दोनदा शक्तिप्रदर्शन केले. शुक्रवारी गोडसे मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आल्यानंतर त्यांच्या आश्वासनाच्या आधारावर त्यांनी नाशिकमध्ये शनिवारी श्री हनुमानाला साकडे घातले.
नाशिकमध्ये जवळपास तीन आमदार आणि ७० नगरसेवक भाजपचे आहेत. नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला आहे. - गिरीश महाजन, मंत्री, भाजप महाजन संकटमोचक आहेत, त्यांनी शेपटीला चिंधी लावून महायुतीत व्यत्यय आणून नये. जे रामराज्य सुरू आहे ते सुरू राहू द्या.- संजय शिरसाट, शिंदे गटाचे प्रवक्तेदिल्लीत महायुतीची बैठक झाली. त्यात नाशिकमधून मी उमेदवारी करावी यासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला. आता महायुतीत योग्य तो निर्णय होईल. - छगन भुजबळ, नेते, अजित पवार गट