नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांच्या तक्रारी, सूचना जाणून घेण्यासाठी ‘वॉक वुईथ कमिशनर’ या उपक्रमाची सुरुवात आजपासून करण्याचे नियोजित केले होते. परंतु, ऐनवेळी मुंढे यांच्या मातोश्रींची प्रकृति बिघडल्याने मुंढे यांनी दोन मिनिटे उपक्रमस्थळी हजेरी लावून पुढील शनिवारी उपक्रम घेण्याचे जाहीर केले. दरम्यान, या उपक्रमांतर्गत ६७ तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारींचे निराकरण दिवसभरात केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे (शहर) यांनी दिली.नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची धुरा स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. प्रशासकीय शिस्त लावण्याबरोबरच त्यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिका-यांवर कारवाईचा बडगाही उगारला आहे. दरम्यान, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरणासाठी तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईत राबविलेली ‘वॉक वुईथ कमिशनर’ ही त्यांचीच संकल्पना नाशिकमध्येही राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, शनिवारी सकाळी ६.५० वाजता गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर त्याची तयारी करण्यात आली होती. तक्रारदार नागरिकांना टोकन दिले जात होते. यावेळी सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. नागरिकांना टोकन देण्याची तयारी सुरू असतानाच तुकाराम मुंढे यांचे आगमन झाले आणि त्यांनी व्यासपीठावर येऊन आपल्या मातोश्रींची प्रकृति अचानक बिघडल्याची माहिती उपस्थितांना दिली आणि आजचा कार्यक्रम पुन्हा एकदा पुढील शनिवारी घेण्याचे जाहीर केले. दोन मिनिटे लोकांशी संवाद साधून नंतर तातडीने मुंढे तेथून निघून गेले. दरम्यान, या उपक्रमांतर्गत ६७ तक्रारी व सूचना प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. या तक्रारींचे निराकरण दिवसभरात करून संबंधितांना त्याची माहिती दिली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी मुंढे यांना समर्थन देण्यासाठी काही लोकही उपस्थित होते तर काही नागरिक करवाढीबद्दल विरोध नोंदविण्यासाठी आले होते.
नाशकात मुंढेंचा ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रम स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 10:54 AM
नाशिक महापालिका : मातोश्रींची प्रकृति बिघडल्याने ऐनवेळी घेतला निर्णय
ठळक मुद्दे मुंढे यांनी नागरिकांच्या तक्रारी, सूचना जाणून घेण्यासाठी ‘वॉक वुईथ कमिशनर’ या उपक्रमाची सुरुवात आजपासून करण्याचे नियोजित केले होतेआजचा कार्यक्रम पुन्हा एकदा पुढील शनिवारी घेण्याचे जाहीर