शहरात लसीकरणाला प्रतिसाद वाढू लागला असतानाच गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून लसींचा साठा अत्यंत अनियमित आहे. त्यामुळे अनेक केंद्रांवर लसींसाठी झुंबड उडत आहे. काही केंद्रांवर तर सकाळी ६ वाजेपासून ज्येष्ठ नागरिक रांगा लावत होते. त्यातच राज्य शासनाने १ मे पासून १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी लसीकरण खुले केल्याने गोंधळ उडाला. शासनाने त्यासाठी लिंकवर आगाऊ नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात नोंदणी होत नसल्याने या वयाेगटातील नागरिकांना लस मिळत नाही आणि ४५ वर्षांवरील नागरिकांनादेखील डाेस मिळत नाही. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने केवळ १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठीच लसीकरण ठेवले होते. त्यामुळे अनेकांना दुसरा डाेसदेखील मिळत नव्हता.
सोमवारी (दि.१०) जिल्ह्यासाठी १९ हजार ५०० डाेस प्राप्त झाले आहेत. त्यात ९ हजार डोस नाशिक शहराला प्राप्त झाले आहेत. त्यात सर्वाधिक डाेस कोविशिल्डचे असून कोव्हॅक्सिन अत्यल्प आहे. त्यामुळे महापालिकेने नाशिक रोड येथील बिटको रुग्णालय, सातपूर येथील ईएसआय रुग्णालय आणि पंचवटीत इंदिरा गांधी रुग्णालयाजवळील रेडक्रॉस शहरी आरोग्य केंद्र येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळात केवळ कोव्हॅक्सिनचे दुसरे डोस ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी देण्याची सोय केली आहे.
याशिवाय, २३ केंद्रांवर कोविशिल्डचे डोस असून त्यात दुसरे डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
इन्फो..
कोविशिल्ड लसीकरणाची केंद्रे अशी
रामवाडी शहरी आरोग्य केंद्र (रावसाहेब थोरात सभागृहासमोर), उपनगर केंद्र, पिंपळगाव खांब, भारतनगर केंद्र, वडाळा गाव, स्वामी समर्थ रुग्णालय, गंगापूर शहरी आरोग्य केंद्र, मखमलाबाद केंद्र, सिन्नरफाटा, दसक पंचक केंद्र, सातपूर कॉलनी येथील केंद्र, संत गाडगे महाराज ॲलिओपॅथी दवाखाना, हिरावाडी केंद्र, कामटवाडे केंद्र, जिजामाता केंद्र, म्हसरूळ केंद्र, संगमा केंद्र (वाजपेयी शाळा), तपोवन केंद्र, नांदूर शहरी आरोग्य केंद्र, वडनेर केंद्र, गोरेवाडी केंद्र, संजीवनगर केंद्र, अंबड येथील शहरी आरोग्य केंद्र.