नाशिक : पर्यावरण संवर्धन करून प्रदूषण म्हणजेच विशेषत: कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी युनोने आखलेल्या झिरो कार्बन मिशनमध्ये नाशिक महापालिकेने सहभाग घेतला आहे. २०५० पर्यंत कार्बनमुक्त शहर करण्यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे आता महापालिका त्या दृष्टीने काम करणार असून, येत्या काही वर्षात अंत्यसंस्कारासाठी होत असलेला लाकडांचा वापर पूर्णत: थांबविण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेने टप्प्याटप्प्याने राबविण्यासाठी काही उद्दिष्ट निश्चित केली असून, त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’शी बोलताना दिली.पर्यावरणीय दृष्टिकोनातून नाशिक हे अत्यंत उत्तम शहर आहे. त्याची हीच ओळख राहावी यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी या उपक्रमाचे उद्दिष्टदेखील पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता शाश्वत विकास असाच आहे. त्यात आता नाशिक महापालिकेने युनोच्या झिरो कार्बन मिशनमध्ये सहभाग घेतल्याची माहिती आयुक्तांनी दिली. कोरोनाचे महासंकट असतानाच यासंदर्भातील प्रस्ताव आल्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. दहा ते पन्नास लाख लोकसंख्येच्या दुसऱ्या स्तरातील शहरांमध्ये नाशिक महापालिकेने सहभाग घेतला आहे.या मोहिमेंतर्गत २०५० पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्बन उत्सर्जन संपुष्टात आणण्याचे उद्दिष्ट आहे. काही उद्दिष्टे महापालिकेने ठरवायची असून, काही युनोच्या माध्यमातून दिली जाणार आहेत.महापालिकेने येत्या तीन ते पाच वर्षांची काही उद्दिष्ट ठरवली आहेत. त्यानुसार अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर पूर्णत: थांबवून त्याऐवजी विद्युत तसेच गॅसदाहिनीचा वापर शंभर टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहरात झाडे लावून ऑक्सिजन हब तयार करणे असे विविध उद्दिष्ट निश्चित करण्यात येणार आहे. युनोच्या माध्यमातून झिरो कार्बन करण्यासाठी काय करता येईल याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. ‘माझी वसुंधरा’मध्ये नाशिक सर्वोत्तमशासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत नाशिक महापालिकेने भरीव कामगिरी केली असून, त्यामुळे शनिवारी (दि. ५) राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन सोहळ्यात आयुक्त कैलास जाधव यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कोरोनाकाळातदेखील महापालिकेने पर्यावरणविषयक कामे सुरूच ठेवली. धुलिकरण रोखण्यासाठी खडीच्या रस्त्यावर पाण्याचा वापर, नदीचे संवर्धन, नदीपात्रातील गाळ काढणे, उद्यानातील वृक्ष संवर्धन अशा विविध कारणांमुळे महापालिकेला हा बहुमान मिळाला आहे.
युनोच्या झिरो कार्बन मिशनमध्ये नाशिक महापालिकेचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 1:34 AM
नाशिक : पर्यावरण संवर्धन करून प्रदूषण म्हणजेच विशेषत: कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी युनोने आखलेल्या झिरो कार्बन मिशनमध्ये नाशिक महापालिकेने ...
ठळक मुद्देआयुक्त कैलास जाधव : येत्या पाच वर्षात नाशकात लाकडांविना होणार अंत्यसंस्कार