हास्य कविसंमेलनात रसिक झाले लोटपोट नाशिक हिन्दी सभा : राजकीय, सामाजिक व्यंगाने नाशिककर अंतर्मुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:03 AM2018-03-10T01:03:55+5:302018-03-10T01:03:55+5:30
नाशिक : ‘सुबह सुबह मै सब्जा मंडा गया, और दुकानदारसे कहा मेथा का सब्जा देदो, उसने कहा मेथा नही मेथी है, मैने कहा गोबा देदो, उसने कहा गोबा नही गोबी है, मैने कहा चलो भेंडा ही देदो.
नाशिक : ‘सुबह सुबह मै सब्जा मंडा गया, और दुकानदारसे कहा मेथा का सब्जा देदो, उसने कहा मेथा नही मेथी है, मैने कहा गोबा देदो, उसने कहा गोबा नही गोबी है, मैने कहा चलो भेंडा ही देदो.. ’ - अशा हास्यव्यंगाच्या कवितांनी नाशिककर श्रोत्यांना लोटपोट हसवले. निमित्त होते नाशिक हिंदी सभेतर्फे आयोजित अखिल भारतीय हिन्दी हास्य कविसंमेलनाचे. होळीच्या पार्श्वभूमीवर हिंदी सभेतर्फे दादासाहेब गायकवाड सभागृहात शुक्रवारी (दि. ९) आयोजित या कविसंमेलनात शशिकांत यादव (देवास), राजेंद्र मालवीय ‘आलसी’, शंभू शिखर (इटारसी), डॉ. भुवन मोहिनी (राजस्थान), सुदीप भोला (दिल्ली) व कपिल जैन (यवतमाळ) यांच्या विनोदी कवितांनी रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. देशभरातील मूर्ती विटंबना, मोदी-अमित शहांचे संबंध, अण्णा आणि अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढाईनंतरचे राजकारण आदी विविध विषयांवर हास्यकवींनी सादर केलेल्या कवितांनी नाशिककरांना मनमुराद हसविले. प्रारंभी अशोका बिल्डकॉनचे चेअरमन अशोक कटारिया व कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नाशिक हिंदी सभेचे संस्थापक गुलाब प्रसाद पांडे, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, सभेचे अध्यक्ष आर्कि. सुरेश गुप्ता, नेमीचंद पोद्दार, उपाध्यक्ष भरत सिंह, ताराचंद गुप्ता, यशवंत सिंह, एम. पी. मित्तल, ओमप्रकाश जाजू,सत्यप्रकाश गुप्ता आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. प्रास्ताविक ठाकूर भरत सिंह यांनी केले.
स्त्रीकेंद्रित काव्याने वेधले लक्ष
‘बेटी से चलते है दो कुल, बेटी ब्यूटिफू ल, वंडरफूल’ या सुदीप भोला यांच्या व ‘एक अधुरी कहानी तो मुझ में भी है, एक मीरा दिवानी तो मुझ में भी है’ या डॉ. भुवन मोहिनी यांच्या स्त्रीकेंद्रित कवितांनी उपस्थितांची दाद मिळविली. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजाने स्त्रीला आई, मुलगी, बहीण, पत्नी, प्रेयसी अशा सर्व रूपांमध्ये सन्मान देण्याचे आवाहनही कवींनी आपल्या कवितांमधून केले.