राज्यात ७.९ नीचांकी तापमान : नाशिककरांना पुन्हा भरली हुडहुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 02:10 PM2020-01-30T14:10:06+5:302020-01-30T14:16:58+5:30
१७ तारखेच्या शुक्रवारची पुनरावृत्ती पुन्हा होते की काय अशी भीती नाशिककरांना वाटू लागली आहे. कारण किमान तापमानाचा पारा एका दिवसात ७ अंशांनी खाली घसरला.
नाशिक : शहराच्या किमान तापमानाचा पारा गुरूवारी (दि.३०) अचानकपणे ७.९ अंशापर्यंत घसरला. त्यामुळे पुन्हा राज्यात सर्वाधिक नीचांकी नोंद नाशिकमध्ये झाली. बुधवारी संध्याकाळपासूनच शहरात थंड वारे वेगाने वाहण्यास सुरूवात झाल्यामुळे गुरूवारी पहाटे थंडीचा तीव्र कडाका नाशिककरांना अनुभवयास आला. त्यामुळे सकाळी रस्त्यांवरील वर्दळदेखील थंडावल्याचे चित्र होते. अचानकपणे थंडीची तीव्रता वाढल्याने नागरिकांना हुडहुडी भरली.
पंधरवड्यापासून शहराचे तापमान १२ ते १५ अंशाच्या जवळपास स्थिरावत असल्यामुळे नाशिककरांना थंडीच्या कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळालेला होता. तत्पुर्वी १७ तारखेला तापमानाचा पारा थेट ६ अंशापर्यंत खाली घसरल्याने या हंगामातील ही नीचांकी नोंद ठरली. त्या तीन दिवसांत नाशिककरांनी कडाक्याच्या थंडीचा सामना केला. निफाडमध्ये तेव्हा २अंशापर्यंत तापमान खाली घसरले होते. १७ तारखेच्या शुक्रवारची पुनरावृत्ती पुन्हा होते की काय अशी भीती नाशिककरांना वाटू लागली आहे. कारण किमान तापमानाचा पारा एका दिवसात ७ अंशांनी खाली घसरला. गुरूवारी थेट ७.९ अंश इतकी नोंद झाल्याने शुक्रवारी पुन्हा तापमानाचा पारा यापेक्षाही खाली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण दिवसभर थंड वारे वाहत होते. सुर्यास्तानंतर थंड वाऱ्याचा वेग अधिक वाढला होता. दहा दिवसांपासून नागरिकांना कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळालेला होता, त्यामुळे थंडी परतू लागल्याची चर्चाही कर्णोपकर्णी होऊ लागली असताना अचानकपणे लहरी निसर्गाने पुन्हा कमाल दाखविल्याने किमान तापमानाचा पारा अचानक खाली कोसळला.
गुरूवारी पहाटेपासून थंडी वाढल्याने सकाळी रस्ते, जॉगिंग ट्रॅकचा परिसर बºयापैकी रिकामा झाल्याचे चित्र होते. सकाळी शाळा, महाविद्यालयांमध्ये जाताना विद्यार्थ्यांनी ऊबदार कपड्यांनी डोक्यापासून पायापर्र्र्यंत स्वत:ला ‘पॅक’ करून घेतले होते. दूध, वर्तमानपत्र, भाजीपाला विक्रेत्यांनीही सकाळचा आपला व्यवसाय सांभाळताना थंडीपासून संरक्षणाचा पुरेपुर उपाय केल्याचे दिसून आले. तसेच गोदाकाठावर उघड्यावर राहणा-या मोलमूजरी करणा-या भटक्यांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी पहाटे शेकोट्या पेटविल्या होत्या. दरम्यान, थंडीचा कडाका वाढल्यामुळे डॉक्टरांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.
आठवडाभरातील नाशिकचे किमान तापमान असे...
गुरूवारी (दि.२३) - १५
शुक्रवारी (दि.२४) - १४.९
शनिवारी (दि.२५)- १४.४
रविवारी (दि.२६) - १४.१
सोमवारी (दि.२७)- १५
मंगळवारी (दि.२८)- १४.५
बुधवारी (दि.२९) १३.९
गुरूवारी (दि.३०) ७.९
प्रमुख शहरांचे आजचे किमान तापमान
महाबळेश्वर - ११.८
अहमदनगर - ९.७
जळगाव - ८.५
मालेगाव - १०
पुणे - ११
नाशिक- ७.९ (निफाड-६)
सातारा - १२
नागपूर - १२.२