नाशिकमध्ये कोणीही कोरोनाबाधित नाही; आज तीन संशयित दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 06:15 PM2020-03-28T18:15:38+5:302020-03-28T18:18:33+5:30
आजपर्यंत पुण्याच्या प्रयोगशाळेत एकूण ६८ कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६४ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
नाशिक : शहरासह जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यात अद्याप ५६८नागरिक कोरोनाग्रस्त देशांमधून दाखल झाले आहेत. १५४ नागरिकांचे १४ दिवसांचे सर्वेक्षण प्रशासनाने पुर्ण केले आहे. आजपर्यंत पुण्याच्या प्रयोगशाळेत एकूण ६८ कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६४ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. कोरोना संक्रमित रुग्णाच्या अद्याप एकाही व्यक्ती संपर्कात आलेला नाही, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.अद्याप चारशेपेक्षा अधिक नागरिकांचे दैनंदिन सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. आज नव्याने दाखल झालेले तीन व कालचा एक अशा चार संशयितांचे अहवाल प्रलंबित आहे.
कोरोना आजाराचा फैलाव देशासह राज्यात वेगाने होऊ लागला आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता १६७ झाला असून, त्यापैकी पाच रुग्ण दगावले आहेत. सुदैवाने अद्याप नाशिकमध्ये कोणीही व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आली नाही. तसेच कोणीही कोरोना संक्रमित रू ग्णालच्या संपर्कात आले नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे. कोरोना संशयित रुग्ण मात्र दररोज आढळून येत असून, त्यांच्यावर सरकारी दवाखान्यातील विलगीकरण कक्षात उपचारही सुरू आहेत. मुंबई, पुणे, सांगली, सातारा आदी शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. शहरात लॉकडाउन कालावधीत कोणीही रस्त्यावर फिरकणार नाही, याची पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह घरात थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यामुळे नागरिकांना सातत्याने घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे. दूध, भाजीपाला, किराणा माल, गोळ्या-औषधे, अन्नधान्य, पिठाची गिरणी यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीनेच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.