१५किलो चांदी, ३५ तोळे सोने घेऊन वर्षभरापुर्वी पोबारा करणार्या कार चालकाच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 09:29 PM2017-11-09T21:29:49+5:302017-11-09T21:35:25+5:30
गुन्ह्याच्या तपासाचा ‘टास्क’ सरकारवाडा पोलिसांना दिला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरिक्षक सारिका अहिरराव व त्यांच्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे तपासचक्रे फिरवून यादव यास सटाणा तालुक्यातील ठेंगोडा या मुळ गावातून ताब्यात घेतले.
नाशिक : कारसाठी चालक म्हणून एका युवकाला नोकरीला ठेवणे गोविंदनगरमधील एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले. सदर चालकाने विश्वास संपादन करुन वर्षभरापुर्वी मालकाच्या घरातून ३५ तोळे सोने व १५ किलो चांदी घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या गुन्ह्याची फिर्याद बुधवारी (दि.८) मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर सरकारवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने संशयित चालकाच्या मुसक्या काही तासांमध्ये आवळून त्याच्याकडून सोने-चांदीही हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, येथील गोविंदनगर परिसरातील एका बंगल्यात घरफोडीमध्ये सुमारे चौदा लाखांचे दागिणे चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. गोविंदनगर पसिरातील चाणक्य बंगल्यामध्ये राहणार्या प्रतिभा प्रकाश चांडक (५८) यांच्या गोविंदनगरमधील समीरा सोसायटीच्या एक क्रमांकाच्या सदनिकेतून सुमारे चौदा लाखांचे दागिने संशयित कारचालक नितीन यादव वालझाडे याने लंपास केल्याची फिर्याद चांडक यांनी मुंबईनाका पोलीस बुधवारी दिली.
पोलिसांनी उशिरा फिर्याद दाखल होण्यामागील कारण स्पष्ट केले नाही. वालझाडे हा अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर असून तो पदव्युत्तर शिक्षणही घेत होता. पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील व सहायक आयुक्त राजू भुजबळ यांनी या गुन्ह्याच्या तपासाचा ‘टास्क’ सरकारवाडा पोलिसांना दिला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरिक्षक सारिका अहिरराव व त्यांच्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे तपासचक्रे फिरवून यादव यास सटाणा तालुक्यातील ठेंगोडा या मुळ गावातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता वालझाडे याने गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेले १००ग्रॅमचे तीन व ५०ग्रॅमचे चार सोन्याची बिस्कीटे तसेच पंधरा किलो चांदी संशयित वालझाडेक डून पोलिसांनी हस्तगत केला.