नाशिक : नाशिक-पुणे विमान सेवेच्या पहिल्याच दिवशी मुंबईहून नाशिकला येणाऱ्या विमानाला दीड तास उशिर झाला आहे. विमान सेवेच्या उद्घाटनाची वेळ टळून गेल्यानंतरही मुंबईहून नाशिकला येणाऱ्या विमानाचे आगमन झालेले नाही. नाशिक-मुंबई-नाशिक व नाशिक-पुणे-नाशिक आणि या दोन विमानसेवा आजपासून सुरू होत असून एअर डेक्कनतर्फे ही विमान सेवा कुरु करण्यात आली आहे. एअर डेक्कनच्या १९ सीटर विमानातून ४० मिनिटांच्या हवाई प्रवासासाठी प्रवाशांना १४०० रूपये मोजावे लागणार काही नशीबवान प्रवाशांना या विमानाने फक्त एक रुपयात प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
नेमकी काय आहे योजना ?
केंद्र सरकारने हवाई संपर्क बळकट करून विविध शहरांना जोडण्यासाठी आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी हवाई वाहतूक सेवा डोळ्यापुढे ठेवून उडान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत नाशिक-मुंबई-पुणे या शहरांसाठी विमानसेवेला मुहूर्त लाभला आहे.नाशिककरांचे विमानाने मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांत जाण्याचे स्वप्न वारंवार भंगले. सर्वसामान्य नाशिककरांना या दोन्ही शहरांपर्यंत पोहचण्यासाठी अधिक वेळ व पैसा खर्च करावा लागत आहे. विमानसेवेचे प्रयत्न अनेकदा झाले मात्र त्यांना फारसे यश आले नाही. केंद्र सरकारने मागील एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या उडान योजनेंतर्गत नाशिककरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. विमानसेवा एअर डेक्कन कंपनीमार्फत पुरविली जाणार आहे. नाशिक-पुणे-मुंबई हा सुवर्ण त्रिकोण मानला जातो, मात्र नाशिक हे या दोन्ही शहरांपासून हवाई संपर्कापासून वंचित राहिले आहे. एअर डेक्कनमार्फत सुरू करण्यात येणा-या या हवाई सेवेच्या माध्यमातून नाशिककर गगनभरारी घेणार आहे. १९ प्रवाशांची क्षमता असलेले विमान नाशिक-मुंबई हवाई सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नाशिक होणार ‘एअर कनेक्ट’नाशिक शहराचा केंद्राच्या उडान योजनेत समावेश झाल्यामुळे प्रमुख सहा शहरांसोबत नाशिक ‘एअर कनेक्ट’ होणार आहे. नाशिकच्या भविष्यकालीन विकासाच्या दृष्टीने हे अत्यंत चांगले संकेत मानले जात आहे. नाशिककरांना मुंबई व पुण्यापर्यंत विमानसेवा उपलब्ध झाल्यास या मोठ्या शहरांमधून देश-विदेशात सहज जाता येणार आहे. या विमानसेवेमुळे कमी वेळेत नाशिककरांना मुंबई व पुण्याला पोहचणे शक्य होणार आहे.
१४२० रुपये प्रतिप्रवासीनाशिक-मुंबई विमानसेवेसाठी उडान योजनेंतर्गत एअर डेक्कन कंपनीकडून प्रतिप्रवासी १४२० रुपये दर आकारण्यात येणार आहे. केंद्राच्या योजनेमुळे नाशिक-मुंबईसाठी सर्वसामान्यांना परवडणारे विमानभाडे निश्चित करण्यात आले आहे.