नाशिककरांनी राखले पर्यावरणाचे भान अन् जपले गोदामाईचे पावित्र्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 06:46 PM2020-09-02T18:46:16+5:302020-09-02T18:52:38+5:30
जनप्रबोधनामुळे मागील काही वर्षांपासून चित्र बदललेले पहावयास मिळत आहे. यावर्षी निर्माल्य संकलनालाही उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी दिला.
नाशिक : अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गणेश विसर्जन करताना नाशिककरांनी गोदामाईचे पावित्र्यही जोपासल्याचे चित्र पहावयास मिळाले. यावर्षी गणेशभक्तांनी आपल्या मुर्ती दान करण्यावर अधिकाधिक भर दिल्याचे दिसून आले. महापालिका प्रशासनाने नदीकाठालगत तसेच जागोजागी उभारलेल्या कृत्रिम तलावात मुर्तींचे नाशिककरांनी विसर्जन केल्याने गोदामाईचा श्वास कोंडला नाही. जलप्रदूषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे दिसून आले.
प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून बनविलेली व विविधप्रकारच्या रासायििनक रंगांचा वापर केलेल्या मुर्तींमुळे नदीचे प्रदूषण वाढीस लागून जलचर जैवविविधता धोक्यात सापडते. या जलप्रदूषणामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. पर्यावरणपुरक उत्सवाची संस्कृती रुजावी व ती वाढावी, याकरिता शहरात मागील दहा वर्षांपासून मनपा प्रशासनासोबत विविध सामाजिक व पर्यावरणप्रेमी संघटनांकडून मुर्ती संकलन अभियान राबविले जात आहे. दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक नाशिककर आपल्या गणेशमुर्ती कृत्रीम तलावात विसर्जित केल्यानंतर त्या दान करतात. यामुळे गोदावरीचे प्रदूषण रोखण्यास काही प्रमाणात यश येते. यावर्षी कोरोनाचे संक्रमण सुरू असल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर शासनाकडून मर्यादा आणल्या गेल्या होत्या. यामुळे विविध सार्वजनिक मंडळांकडूनही मोठ्या गणेशमुर्तींची यंदा प्रतिष्ठापना केली गेली नव्हती. त्यामुळे मोठ्या मुर्ती नदीपात्रात विसर्जित झाल्या नाही.
लाडक्या बाप्पाला विसर्जनासाठी आणताना प्रत्येक भाविक आपल्यासोबत निर्माल्याची पिशवी बाळगतो. श्रध्देपोटी निर्माल्यही यापुर्वी नदीपात्रात टाकले जात होते; मात्र जनप्रबोधनामुळे मागील काही वर्षांपासून चित्र बदललेले पहावयास मिळत आहे. यावर्षी निर्माल्य संकलनालाही उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी दिला. महापालिका प्रशासनाच्या निर्माल्य संकलन रथातून हजारो टन निर्माल्य वाहून नेण्यात आले.
साधेपणामुळे गोदाप्रदूषणाला आळा
यंदा कोरोनामुळे गणेशोत्सव व विसर्जन अगदी साधेपणाने करण्यावर नाशिककरांनी भर दिला. यामुळे गोदाप्रदूषणाला आळा बसण्यास मदत झाली. गोदावरीसह तिच्या उपनद्या असलेल्या नंदिनी, वालदेवी, दारणा नद्यांचेही प्रदूषण नियंत्रणात राहिले. बहुतांश नागरिकांनी आपआपल्या इमारतीच्या आवारात कृत्रिम कुंड उभारुन सर्व रहिवाशांच्या बाप्पांचे विसर्जन करत मुर्ती मनपाकडे दान केल्या. यामुळे गोदाघाटावर मुर्ती विसर्जनाकरिता फारशी झुंबड उडाल्याचे दिसून आले नाही.