नाशिकला शेखर निकमसह टोळीवर अखेर ‘मोक्का’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 04:42 PM2017-12-23T16:42:30+5:302017-12-23T16:42:35+5:30
नाशिक : गुन्हेगारीत सातत्याने सक्रिय राहणारा पंचवटीतील सराईत गुंड शेखर निकम (२७) व त्याच्या टोळीवर पोलीस महासंचालकांच्या परवानगीने अखेर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकम टोळीविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्कान्वये दोषारोपपत्र दाखल के ले आहे.
पंचवटी परिसरातील फुलेनगर परिसरात निकम टोळीच्या गुंडांनी शहरात दहशत माजवून अनेक गंभीर गुन्हेगारीच्या घटना घडवून आणल्या आहेत. निकमसह विशाल चंद्रकांत भालेराव (२६), संतोष प्रकाश पवार (१८), केतन राहुल निकम (१८), संदीप सुधाकर पगारे (२९) यांच्या विरोधात मोक्कान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी महासंचालकांना पाठविला होता. या प्रस्तावाला पोलीस महासंचालकांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाचे तपासी अधिकारी सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, पंचवटीचे सहायक पोलीस निरीक्षक के. डी. वाघ यांनी तपास करून संशयितांविरुद्ध पुरावे गोळा करून न्यायालयात सादर केले. टोळीचा म्होरक्या शेखरवर ९, विशालवर १४, संतोष व केतनविरुद्ध प्रत्येकी एक आणि संदीपविरुद्ध तीन गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.