नाशिकला शिवशाहीचा मार्ग होणार ‘प्रशस्त’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:26 AM2018-01-25T11:26:48+5:302018-01-25T11:34:13+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागासाठी सुमारे ३७ शिवशाही बसेस दाखल झाल्या
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ‘शिवशाही’ या आरामदायी वातानुकूलित बसला डेपोत सहज शिरता यावे यासाठी डेपो क्रमांक एकचे प्रवेशद्वार तोडण्यात आले असून, प्रवेशद्वाराजवळील सुरक्षारक्षकाची कॅबिनही तोडावी लागली आहे. विशष म्हणजे डेपोत आता शिवशाही बसेसला थांबण्यासाठी स्वतंत्र जागा केली जाण्याची शक्यता आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागासाठी सुमारे ३७ शिवशाही बसेस दाखल झाल्या आहेत. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या शिवशाही बसेसला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता नाशिकच्या सेवेत टप्प्याटप्प्याने शिवशाही बसेस नाशिकमध्ये आणण्यात आल्या. या सर्व बसेस नाशिक डेपो क्रमांक एक येथील वर्कशॉपमध्ये उभ्या केल्या जातात. परंतु या बसेसला स्थानकात वळण्यासाठी होणारी अडचण आणि कमी पडणारी जागा लक्षात घेता संरक्षक भिंतीसह येथील प्रवेशद्वारच तोडण्यात आले आहे.
शिवशाही बसेस दाखल झाल्यानंतर महामंडळाचा चेहरा बदलण्यास मदत झाली असली तरी या बसेससाठी महामंडळालादेखील बदलावे लागले आहे. बसेसच्या देखाभाल दुरुस्तीच्या कामापासून ते चालकापर्यंत अनेकांना प्रशिक्षण घ्यावे लागले आहे. या बसेसवर चालक म्हणून काम करणाºया चालकांना अगोदर प्रशिक्षण देण्यात आले होते. तर तांत्रिक बाबींची माहिती व्हावी म्हणून वर्कशॉपमधील तंत्रज्ञ तसेच कर्मचाºयांनाही ट्रेनिंग देण्यात आले आहे. त्यामुळे शिवशाही आल्याने कर्मचाºयांना अगोदर प्रशिक्षण घ्यावे लागल्याने कर्मचाºयांना प्रशिक्षणाला सामोरे जावे लागले आहे. हा सकारात्मक बदल मान्य केला तरी काही बाबींमुळे कर्मचाºयांना त्रासही सहन करावा लागला आहे. बसेसची किरकोळ कामे येथे होत असली तरी बिघाड झाल्यानंतर या बसखाली शिरण्याला अत्यंत निमुळती जागा असल्याने तंत्रज्ञ शक्यतो बसच्या खाली काम करण्यास धजावत नाही. शिवशाहीचे पंक्चर काढणेही इतर बसपेक्षा अत्यंत कठीण मानले जाते. हा कामाचा भाग असला तरी कर्मचाºयांना ते निमूट सहन करावे लागत आहे.
शिवशाही बसची लांबी जास्त असल्याने या बसला वळण घेऊन डेपोत शिरण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे आता एन.डी. पटेल रोडवरील डेपोतील प्रवेशद्वार तोडण्यात आले असून सुरक्षारक्षक कॅबिनही तोडण्यात आली आहे. सद्यस्थितीत सुरक्षारक्षकाला उघड्यावर बसूनच कामकाज करावे लागत आहे. शिवशाही बसमुळे डेपोचा मार्ग प्रशस्त होणार असला तरी या बसेसला व्हीआयपी ट्रीटमेट देण्यासाठी या बसेस स्वतंत्र जागेत उभ्या केल्या जाणार आहेत. याबाबतचे नियोजन अद्याप व्हायचे आहे. मात्र शिवशाहीचा सध्याचा थाट पाहता येणाºया काळात डेपोत या बसेसची चांगलीच बडदास्त राखली जाणार असेच दिसते.