जगातील सर्वांत मोठे गांधीजींचे धातुशिल्प नाशिकमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 01:42 AM2019-10-01T01:42:59+5:302019-10-01T01:43:16+5:30
राष्टपिता महात्मा गांधी यांची १५०वी जयंती येत्या दि. २ आॅक्टोबर रोजी साजरी होणार असून, त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे कार्यक्रम देशभरात होणार आहेत. महात्मा गांधींच्या संकल्पनेतील ‘नई तालीम’ शिक्षणप्रणालीचा प्रसार व्हावा, त्यांच्या विचारांची आणि कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने महात्मा गांधींचे जगातले पहिले सर्वांत मोठे धातू शिल्प नाशिकच्या इस्पॅलियर हेरिटेज शाळेत साकारण्यात आले आहे.
सातपूर : राष्टपिता महात्मा गांधी यांची १५०वी जयंती येत्या दि. २ आॅक्टोबर रोजी साजरी होणार असून, त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे कार्यक्रम देशभरात होणार आहेत. महात्मा गांधींच्या संकल्पनेतील ‘नई तालीम’ शिक्षणप्रणालीचा प्रसार व्हावा, त्यांच्या विचारांची आणि कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने महात्मा गांधींचे जगातले पहिले सर्वांत मोठे धातू शिल्प नाशिकच्या इस्पॅलियर हेरिटेज शाळेत साकारण्यात आले आहे. येत्या बुधवारी (दि. २) गांधी जयंती निमित्ताने हे शिल्प नाशिकरांसाठी खुले करण्यात येईल.
त्र्यंबक विद्यामंदिरजवळील इस्पॅलियर हेरिटेज शाळेत सचिन जोशी यांच्या संकल्पनेतून मूर्तिकार श्याम लोंढे यांनी धातू शिल्पाची डिझाइन आणि निर्मिती केली आहे. हे स्तंभ धातू शिल्प एक विशिष्ट अँगलमध्ये उभे राहिल्यानंतरच महात्मा गांधींची प्रतिमा दिसते. सृजनात्मक कलानिर्मिती असून, जमिनीपासून तब्बल २५ फूट उंच आहे. यासंदर्भात माहिती देताना शाळेचे संचालक सचिन जोशी यांनी सांगितले की, इस्पॅलियर हेरिटेज शाळेच्या प्रांगणात श्याम लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम महेश बच्छाव यांनी संकल्पित चित्र तयार केले. यात अभियांत्रिकी विज्ञान याचा उपयोग करण्यात आला आहे, अशीही माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महात्मा गांधींचे धातू शिल्प उभारतांना ३० लेझरकट स्टील कॉलम (स्तंभ) २० फूट उंच, १८ फूट रु ंद, जमिनीपासून २५ फूट उंच असलेले शिल्प साकारण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला. इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड आणि एशिया बुक आॅफ रेकॉर्ड मध्ये या शिल्पाची नोंद झाली आहे. जगातील हे पहिलेच धातू शिल्प आहे. २०२० मध्ये प्रकाशित होणाऱ्या ग्रँड मास्टर्स कॅटेगिरीत स्तंभ धातू शिल्पाची निवड झाली आहे. हे धातू शिल्प दि. २ आॅक्टोबर (गांधी जयंती), दि. ३० जानेवारी (गांधी पुण्यतिथी), १५ आॅगस्ट (स्वातंत्र्य दिन), २६ जानेवारी, ५ सप्टेंबर (शिक्षक दिन) या दिवशी जगातील पर्यटकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे.