नाशिक : शासनाच्या कर्मचारी कपात धोरणाच्या विरोधात व सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह ग्रामविकास विभागाकडील विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.11) काळ्या फिती लावून काम केले. त्याचबरोबर दुपारच्या भोजन अवकाशात जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर सरकारविरोधात घोषणाबाजीसह निदर्शने करून कर्मचारी संघटनेने आंदोलन केले.जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसदर्भात मुख्यमंत्री तसेच ग्रामविकासमंत्र्यांनी दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या नाशिक शाखेने सोमवारी काळ्या फिती लावून काम करताना सरकारी धोरणाचा निषेध नोंदवला. या आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी सरकारने कर्मचारी कपात धोरण तातडीने रद्द करून आवश्यक त्या ठिकाणी जादा व रिक्त पदे सरळसेवा व पदोन्नती तत्काळ भरावी, जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गातील कमर्चाऱ्यांच्या वेतनातील त्रृटी दूर कराव्यात, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करून फरकाच्या रकमेमधून नवीन वर्षाच्या सुरुवातीला 25 हजार रुपयांची अग्रीम रक्कम रोक स्वरुपात मिळावी, अनुकंपा भरती प्रक्रियेतील टक्केवारीची अट रद्द करवी, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता व प्रलंबित देय फरकाची रक्कम रोखीने अदा करावी, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, पाच दिवसांचा आठवडा करावा, महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बालसंगोपन रजा द्यावी आदी मागण्यांसोबतच ग्रामविकास विभागाकडील विविध प्रलंबित मागण्यांचाही सरकाने गांभीर्याने विचार करून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांनी केली आहे. दुपारी भोजन अवकाशात जिल्हा परिषद कार्यालयासमोर संतप्त निदर्शने करताना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. यावेळी सर्व क र्मचारी संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या संवर्गातील मागण्या प्रातिनिधिक स्वरुपात कर्मचाऱ्यांसमोर मांडल्या. यावेळी विजयकुमार हळदे, प्रशांत कवडे, विलास शिंदे, जी. पी. खैरनार, बाळासाहेब कोठुळे, महेंद्र पवार, किशोर वारे, प्रमोद निरगुडे, दिनकर सांगळे, संदीप गावंडे, रवि देसाई, मनीषा जगताप, संजीवनी पाटील, मंदाकिनी पवार यांसह सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
नाशिक जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी घोषणाबाजीसह काळ्या फिती लावून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 8:07 PM
कर्मचारी कपात धोरणाच्या विरोधात व सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह ग्रामविकास विभागाकडील विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.11) काळ्या फिती लावून काम केले.
ठळक मुद्देजिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून काम जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर सरकारविरोधात घोषणाबाजीभोजन अवकाशात कर्मचारी संघटनांचे आंदोलन